नियम मोडल्यास परवाना निलंबित

प्रवीण जाधव
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

सातारा - वाहतूक नियमांचे कडक पालन करण्यासाठी वाहनधारकांना शिस्त लागावी, यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून कडक धोरण राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत नियम मोडणाऱ्यांचा वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्याची कारवाई केली जाणार आहे.

सातारा - वाहतूक नियमांचे कडक पालन करण्यासाठी वाहनधारकांना शिस्त लागावी, यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून कडक धोरण राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत नियम मोडणाऱ्यांचा वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्याची कारवाई केली जाणार आहे.

दरवर्षी देशभरात मोठ्या प्रमाणावर लोकांचा अपघाती मृत्यू होतो. कोणत्याही आजाराने मरणाऱ्या लोकांच्या संख्येपेक्षा ही संख्या जास्त आहे. अपघात होऊ नये तसेच झाल्यास त्यामध्ये जीवितहानी होऊ नये त्यासाठी वाहनचालकांना शिस्त लागणे आवश्‍यक आहे. त्यासाठी मोटार वाहन कायद्यानुसार विविध नियम करण्यात आले आहेत. त्यामध्ये दंडात्मक तरतुदी आहेत. मात्र, या दंडात्मक कारवाई करूनही वाहनचालकांकडून वारंवार नियमांचे उल्लंघन होते. परिणामी अपघातांची संख्या नियंत्रणात येत नाही. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एक रस्ता सुरक्षा समिती नेमण्यात आली होती. या समितीने देशभरातील अपघातांची संख्या कमी करण्यासाठी वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते. या सूचनांमध्ये वाहतूक नियमांचे प्रामुख्याने हेल्मेटचा वापर न करणे, सिटबेल्ट न बांधणे, अवैध प्रवासी वाहतूक, ओव्हर लोड माल या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्याच्या सूचना होत्या.

या सूचनांनुसार जिल्हापातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या वाहतूक सुरक्षा समितीमध्ये चर्चा झाली. त्यानुसार जिल्ह्यातील वाहनचालकांवरही कारवाई करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार पोलिसांनाही अशा प्रकारच्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचा परवाना निलंबित करण्याबाबतचे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी याबाबतचे प्रस्ताव तयार करण्यास सुरवात करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांनी आता खबरदारी घेऊन वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्‍यक बनले आहे. अन्यथा त्यांना ९० दिवस वाहन चालवता येणार नाही, अशी कारवाई होऊ शकते.

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वाहतूक नियमांचे पालन करण्याची शिस्त वाहनधारकांत लागणे आवश्‍यक आहे. त्यासाठी नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांचा परवाना निलंबित करण्यात येणार आहे. निलंबन होऊनही पुन्हा तशा प्रकारचा नियम मोडल्याचे निदर्शनास आल्यावर परवाना रद्दचीही कारवाई होऊ शकते. त्यामुळे वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी केले.

Web Title: Suspend license if rules break RTO