महापूर, बांधकामे याबाबत श्वेतपत्रिकेची कोल्हापूर महापालिकेत मागणी

महापूर, बांधकामे याबाबत श्वेतपत्रिकेची कोल्हापूर महापालिकेत मागणी

कोल्हापूर - ब्ल्यू लाईन, रेडझोनमध्ये गडबड करून मुंबई येथे झालेल्या बैठकीत बिल्डर लॉबीने ५०० एकर जागा सोडवून घेतल्याचा आरोप नगरसेवक भूपाल शेटे यांनी केला. महापूर आणि बांधकामे याबाबतची श्‍वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणीही महापालिका सभेत केली.

सभेत अनेक नगरसेवकांनी शहरात मोठ्या प्रमाणात आलेल्या पुराच्या पाण्यास रेडझोनमध्ये भराव टाकून केलेली बांधकामे हेच कारण असल्याचे स्पष्ट करत यापुढे येथे बांधकाम परवाने देऊ नका, भराव टाकून बांधकामे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, तसेच रेडझोनमध्ये झालेली बांधकामे व आलेला महापूर याची श्‍वेतपत्रिका महापालिका प्रशासनाने प्रसिद्ध करावी, अशी मागणी या सभेत केली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर माधवी गवंडी होत्या.

प्रश्‍नोतराच्या सत्रात हा मुद्दा सत्यजित कदम यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, महापुराने मोठी हानी झाली आहे. १९८९, २००५ आणि आता २०१९ च्या पुराची तुलना केली, तर २००५ पेक्षाही पाणी दहा फुटाने जास्त होते. शहरात रेडझोनमध्ये झालेली बांधकामे आणि रेडझोनमध्ये टाकलेले भरावच याला जबाबदार आहेत. २००५ मध्ये एकच ब्ल्यू लाईन होती, ती बापट कॅम्प ते गांधीनगर या बाजूने होती. आता जी ब्ल्यू लाईन पाटबंधारे विभागाने बनविली आहे. ती २००५ चा महापूर लक्षात घेता केली आहे, पण यंदा त्याहीपेक्षा मोठा पूर आल्याने २०१९ ची पूररेषा गृहित धरून ही ब्ल्यू लाईन करावी.

भूपाल शेटे म्हणाले, २ जुलैला मुंबईत मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या ब्ल्यू लाईन संदर्भातील बैठकीत बिल्डर लॉबीने रेडझोनमधील ७०० एकर जागेपैकी ५०० एकर जागा सोडवून घेतली आहे. कोल्हापूरच्या भविष्याच्या दृष्टीने हे घातक असून, रेडझोनमध्ये कोणत्याही स्थिती बांधकाम परवाने देऊ नयेत, आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी १२ जुलैला जो तूर्त बांधकाम परवाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यावर त्यांनी कायम ठाम राहावे. रेडझोनमध्ये बांधकामे करून बिल्डर कोट्यवधी रुपये कमवून गेले, पण यामुळे अनेक गोरगरिबांचे संसार डोळ्यांदेखत वाहून गेले. हे बिल्डर मात्र महापुरात कोठेच दिसले नाहीत.

राजाराम गायकवाड म्हणाले, रेडझोनमध्ये भराव टाकून बांधकामे केल्याच्या अनेक लेखी तक्रारी देऊनही नगररचना विभागाने कोणतीच कारवाई केलेली नाही.  त्याचाच परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात पूर आला. रमणमळा ही गोरगरिबांची वसाहत पूर्णपणे पाण्यात होती. याला सर्वस्वी ही बांधकामेच आहेत. दिलीप पोवार यांनीही रेडझोनमधल्या बांधकामाला सर्वस्वी बिल्डरच जबाबदार असून या परवानग्या दिल्याच कशा, असा सवाल उपस्थित केला.

माधुरी लाड यांनीही खानविलकर पेट्रोल पंप ते कसबा बावडा येथील रेणुका मंदिरपर्यंत बांधकाम परवाने देणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी केली.

सुनील कदम म्हणाले, ब्ल्यू लाईन निश्‍चितीचे काम झाले तरी महापलिकेला याचा पत्ताच नाही. शहराची ब्ल्यू लाईन महापालिकेला वगळून कशी काय केली जाते. रेडझोनमधल्या बांधकामानेच हा हाहाकार माजला. मुळात हिरव्या पट्टयातल्या जागा, पिवळ्या पट्ट्यात घेऊन हा बाजार झाला आहे. आता तरी प्रशासनाने जागे व्हावे. कोणाच्याही दबावाला बळी न पडता, ब्ल्यू लाईन नव्या २०१९ ची पूररेषा बघून तयार करावा, तसेच रेडझोनमधली बांधकामे आणि २०१९ चा महापूर यासंदर्भात महापालिका प्रशासनाने श्‍वेतपत्रिका काढावी. प्रा. जयंत पाटील यांनी मात्र २०१९ च्या या महापुरास आलमट्टी धरणच जबाबदार आहे. कोणतेही धरण हे जुलै, ऑगस्ट महिन्यात पूर्ण भरले जात नाही. आलमट्टी धरण मात्र ऑगस्टमध्येच भरले. त्यांनी पुढे पाण्याचा विसर्ग केला नाही. त्यामुळे कृष्णा नदी आणि तिला मिळणाऱ्या सगळ्या उपनद्यांच्या पाण्याला फूग आल्याने कोल्हापूर, सांगलीला महापुराचा मोठा फटका बसला.

कुसाळे यांचा सत्कार
पाणीपुरवठा योजना सुरळीत करण्याच्या कामात नगरसेवक शेखर कुसाळे यांचाही सहभाग मोलाचा होता. त्यांचा महासभेत सत्कार झाला. कुसाळे यांनी बालिंगा, शिंगणापूर योजनेतील जी उपसा केंद्रे आहेत, ती अद्ययावत करण्याची गरज आहे. तसेच त्यांची उंची ही पूररेषेपासून वर असायला हवी. त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.

अग्निशमन दलातील त्या जवानांना कायम करा
अग्निशमन दलाच्या जवानांनी महापुराच्या काळात उत्कृष्ट काम केले. त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम केशवराव भोसले नाट्यगृहात घेतलाच पाहिजे. तसेच हे सर्व कर्मचारी ठोक मानधनावर काम करणारे आहेत. त्यांना कायम करावे, अशी मागणी नगरसेवक किरण नकाते यांनी केली. सत्यजित कदम, जयश्री चव्हाण यांच्यासह बहुतांश नगरसेवकांनी ही मागणी उचलून धरली. दरम्यान, स्वच्छता व साफसफाई करणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांनाही कायम करा, अशी मागणी संतोष गायकवाड यांनी केली.

आयुक्तांचे नाव एका शाळेला द्या
रूपाराणी निकम यांनी नालेसफाईमुळे राजेंद्रनगर प्रभागातील एकाही झोपडीत पाणी शिरले नाही. हे केवळ आयुक्तांमुळेच शक्‍य असल्याचे सांगितले. त्यानंतर नगरसेवक अशोक जाधव यांनी आयुक्त कलशेट्टी यांचे काम खूपच चांगले झाले आहे. नशिबाने कोल्हापूरला असा अधिकारी मिळाल्याने त्यांचे नाव एखाद्या शाळेला द्यावे, अशी मागणी केली. यावेळी सर्व नगरसेवकांतर्फे सत्यजित कदम यांनी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचाही सत्कार केला.

...तर गप्प बसणार नाही
पाटबंधारे विभागाने कोणाच्याही दबावाला बळी पडून ब्ल्यू लाईनमध्ये गडबड करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा सत्यजित कदम तसेच सुनील कदम यांनी दिला आहे. सुनील कदम म्हणाले, की यासंदभात आता मुख्यमंत्री जेव्हा कोल्हापूरला येतील, त्यावेळी मी प्रसंगी उपोषणही करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com