सदाभाऊंसमोरच "स्वाभिमानी'ने दाखवले मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

सांगली - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासमोरच आज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवत निषेध नोंदवला. शेतकरी कर्जमाफी प्रकरणी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. 

सांगली - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासमोरच आज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवत निषेध नोंदवला. शेतकरी कर्जमाफी प्रकरणी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. 

एकीकडे खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला दांडी मारून आज नाशिक येथे शिवसेनेच्या शेतकरी मेळाव्याला हजेरी लावत भाजपविरुद्धचा रोष दाखवून दिला, तर दुसरीकडे सदाभाऊंसमोर काळे झेंडे फडकवल्याने संघटनेतील फूट पुन्हा एकदा अधोरेखीत झाली. स्वाभिमानीच्या पुणे-मुंबई आत्मक्‍लेश आंदोलनाच्या तोंडावर हा बंब पेटल्याने संघटनेतील वातावरण चांगलेच तापले आहे. 

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस नकार दिल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानीतर्फे काळे झेंडे दाखवण्यात आले. पोलिसांनी चहूबाजूंनी नाकेबंदी केलेली असताना चार कार्यकर्त्यांनी नूतन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गनिमी काव्याने आंदोलन केले. त्या चौघांना अटक करण्यात आली असून सकाळी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांच्यासह तिघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी धरपकड सुरू केली. त्यातूनही चकवा देत महावीर पाटील, वैभव चौगुले, संजय बेले व अभिजित पाटील यांनी काळे झेंडे फडकावले. श्री. देशमुख यांच्यासह राज्य प्रवक्ते महेश खराडे, भास्कर कदम यांना ताब्यात घेऊन दौऱ्यानंतर सोडण्यात आले. अटक करण्यात आलेल्यांवर उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आलेले नव्हते. 

गनिमी कावा 
राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत निर्णय घेतला जात नसल्याच्या निषेधार्थ काळे झेंडे दाखवण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला होता. गनिमी काव्याने अन्य मंत्र्यांच्या गाड्या फोडू, असे बैठकीत ठरले होते. त्यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली होती. या आंदोलनाचे नेतृत्व विकास देशमुख, महेश खराडे करणार असल्याने त्यांना ताब्यात घेऊन आंदोलनातील हवा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर चार शेतकरी कार्यकर्त्यांनी खिशात काळे झेंडे लपवून नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात प्रवेश केला. चौफेर बंदोबस्त असूनही कार्यकर्ते पोलिसांना ओळखू आले नाहीत. मुख्यमंत्री उद्‌घाटन करून बाहेर पडताना प्रवेशद्वारावरच कार्यकर्ते प्रगट झाले. काळे झेंडे दाखवत त्यांनी राज्य सरकारविरोधात घोषणा दिल्या. घोषणांना सामोरे जातच मुख्यमंत्री पुढे रवाना झाले. इकडे पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अटक केली. घोषणा देत ते गाडीत जाऊन बसले. 

सदाभाऊंचा हात; राजू शेट्टींचे टोले 
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आज मुख्यमंत्र्यांच्या हातात हात गुंफून जिल्ह्याच्या दौऱ्यात पुढे होते. जिल्ह्यातील एकमेव मंत्री असल्याने त्यांनी जातीने सर्व कार्यक्रमांना हजेरी लावली. तिकडे नाशिकमध्ये खासदार राजू शेट्टी यांनी भाजप सरकार आणि मुख्यमंत्र्यांविरुद्ध जोरदार टोलेबाजी केली. या दोन्ही घटना या नेत्यांच्या दिशा स्पष्ट करणाऱ्या आहेत का, अशी चर्चा दिवसभर रंगली होती. 

Web Title: Swabhimani activists show black flags to the Chief Minister