स्वाभिमानीचे ऊस दर आंदोलन चिघळण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

परिते (ता. करवीर) येथे रात्री ऊस भरून आलेल्या पाच ट्रक अडवून त्यांच्या चाकातील हवा स्वाभिमानीच्या आंदोलकांनी सोडली. या वेळी ट्रकमालक व आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली, तर राधानगरी तालुक्‍यात सुरू असलेल्या तीन ठिकाणची ऊसतोडही बंद पाडली.

राशिवडे बुद्रुक ( कोल्हापूर ) - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस दराबाबतचे आंदोलन आता चिघळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

परिते (ता. करवीर) येथे रात्री ऊस भरून आलेल्या पाच ट्रक अडवून त्यांच्या चाकातील हवा स्वाभिमानीच्या आंदोलकांनी सोडली. या वेळी ट्रकमालक व आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली, तर राधानगरी तालुक्‍यात सुरू असलेल्या तीन ठिकाणची ऊसतोडही बंद पाडली. यामुळे स्वाभिमानीच्या आंदोलनाला आता ठिणगी पडल्याचे स्पष्ट झाले आहे. 

प्रतिवर्षीप्रमाणे ऊस दराचा तोडगा निघाल्याशिवाय आणि जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत होणारा निर्णय कारखान्यांनी मान्य केल्याशिवाय कोणत्याही कारखान्याने ऊस तोड देऊ नये, असा प्रघातच काही वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून घालण्यात आला आहे. यंदाही दराबाबतची भूमिका अद्याप स्पष्ट न झाल्याने दोन दिवसांपूर्वी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी या परिसरात तोडणी सुरू असलेल्या कारखान्यांना सक्तीच्या सूचना दिल्या होत्या, तरीही या परिसरातून गगनबावडाच्या डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याला ऊस भरून जात होता.

काल बुधवारी रात्री हळदी (ता. करवीर) येथे ट्रक अडविले होते. 
याबाबत कारखान्याच्या प्रशासनाला सक्त सूचना दिली होती, तरीही आज राधानगरी तालुक्‍यातील कौलव आणि कसबा तारळे येथे ऊसतोड सुरू होती. या फडात जाऊन स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ऊसतोड बंद पाडली, तर आज रात्री ठिकपुर्ली फाट्यावर कार्यकर्त्यांनी जमून या परिसरातून जाणाऱ्या उसाच्या ट्रकांची आडवाआडवी केली. यामध्ये ऊस भरून आलेल्या तीन ट्रकच्या चाकांमधील कार्यकर्त्यांनी हवा सोडून दिली.

यावेळी ट्रकमालक आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याने तणाव निर्माण झाला होता. तेथील परिस्थिती पाहून राधानगरीकडून आलेले दोन ट्रक कौलव परिसरातच रस्त्यावर थांबवण्यात आले. 

ठिकपुर्ली फाट्यावरील तीन ट्रक शेतकरी संघटनेने ताब्यात घेतले असून, याबाबतचा निर्णय झाल्याशिवाय न सोडण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. यामुळे ऊसदर आंदोलनाची ठिणगी भोगावती कारखाना परिसरातच आंदोलकांनी टाकली असून, जिल्ह्यातील सुरू असलेल्या साखर कारखान्यांना त्यांनी 
इशाराच दिला आहे. 

आंदोलनात भोगावती परिसर अध्यक्ष जनार्दन पाटील, साताप्पा पाटील, रावसो डोंगळे, रंगराव पाटील, आण्णासो चौगले, विलास पाटील, बाबूराव पाटील, शंकर जाधव, सुभाष पोवार, भीमराव गोनुगडे, अनिल मगदूम, तानाजी पाटील आदींनी नेतृत्व केले. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swabhimani Farmers Organisation Agitation For Sugarcane Rate