तीन जागा द्या; अन्यथा स्वबळावर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 फेब्रुवारी 2019

तीन जागांवर ठाम - काटे
आघाडीला आमची गरज असेल तर आम्ही हातकणंगलेसह वर्धा व बुलाडाणा या तीन जागांवर ठाम आहोत. काल झालेल्या बैठकीत यावरच चर्चा झाली. आघाडीकडून योग्य प्रस्ताव न आल्यास ‘स्वाभिमानी’चा मार्ग मोकळा आहे. कोणासोबत जायचे याचा निर्णय २८ फेब्रुवारीच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेऊ, असे जिल्हाध्यक्ष काटे यांनी सांगितले.

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीत हातकणंगलेसह वर्धा व बुलडाण्याची जागा दिली तरच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाऊ; अन्यथा स्वबळावर लढण्याचा निर्धार शनिवारी (ता. २२) मध्यरात्री झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत झाला. नागाळा पार्कातील एका हॉटेलात रात्री ११ ते पहाटे चार वाजेपर्यंत ही बैठक झाली. 

दरम्यान, २८ फेब्रुवारी रोजी पुण्यात संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक बोलविली आहे, तोपर्यंत काँग्रेस आघाडीकडून योग्य तो प्रस्ताव न आल्यास या बैठकीतच स्वतंत्र लढायचे, की अन्य पर्याय निवडायचा, याचा निर्णय घेण्याचेही ठरले. 

भाजपपासून काडीमोड घेतल्याने ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी यांनी राज्य व केंद्र सरकारविरोधात लढाई पुकारली आहे. या लढाईत त्यांनी नेहमीच्या ‘स्टाईल’प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच टीका सुरू केली आहे. हे करत असताना नकळत ते काँग्रेस, राष्ट्रवादीकडे झुकल्याचे पहायला मिळाले; पण ऊस दरावरून पुन्हा त्यांनी आघाडीपासून चार हात लांबच राहण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी आघाडीसोबत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आघाडीनेही त्यांची हक्काची हातकणंगलेची जागा सोडण्याची तयारी दर्शवली होती. 

पण उसाच्या एकरकमी एफआरपीवरून पुन्हा आघाडीशी त्यांचे बिनसले. राज्यातील साखर उद्योगावर दोन्ही काँग्रेसचे वर्चस्व आहे. कारखानदारांनी एकरकमी एफआरपी न दिल्याने पुन्हा त्यांच्यासोबतच गेलो तर चुकीचा संदेश कार्यकर्त्यांत जाईल, म्हणून श्री. शेट्टी हे दुसरा पर्याय नाही, तरीही आघाडीपासून दूर आहेत. 

या पार्श्‍वभूमीवर संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची काल मध्यरात्री कोल्हापुरात बैठक झाली. बैठकीला श्री. शेट्टी यांच्यासह रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोपळे, जिल्हाध्यक्ष भगवान काटे, प्रा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक आदी उपस्थित होते. संघटनेला हातकणंगलेसह वर्धा व बुलढाणा हे लोकसभेचे मतदारसंघ हवेत. तसा प्रस्ताव आघाडीकडे दिला आहे. त्यांनी निर्णय घ्यावा, असे या बैठकीत ठरले. 

तीन जागांवर ठाम - काटे
आघाडीला आमची गरज असेल तर आम्ही हातकणंगलेसह वर्धा व बुलडाणा या तीन जागांवर ठाम आहोत. काल झालेल्या बैठकीत यावरच चर्चा झाली. आघाडीकडून योग्य प्रस्ताव न आल्यास ‘स्वाभिमानी’चा मार्ग मोकळा आहे. कोणासोबत जायचे याचा निर्णय २८ फेब्रुवारीच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेऊ, असे जिल्हाध्यक्ष काटे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swabhimani Farmers organisation meeting