लोकमंगल'समोर स्वाभिमानीचे गुरुवारपासून उपोषण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

सोलापूर : यंदाच्या गळित हंगामात गाळप होणाऱ्या ऊसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये दर द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी निगडित असलेल्या लोकमंगल साखर कारखान्यासमोर (भंडारकवठे, ता. दक्षिण सोलापूर) गुरुवारपासून (ता. 15) धरणे आमरण उपोषण करणार आहे.

सोलापूर : यंदाच्या गळित हंगामात गाळप होणाऱ्या ऊसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये दर द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी निगडित असलेल्या लोकमंगल साखर कारखान्यासमोर (भंडारकवठे, ता. दक्षिण सोलापूर) गुरुवारपासून (ता. 15) धरणे आमरण उपोषण करणार आहे.

जिल्ह्यातील यंदाच्या हंगामातील ऊस दराचा तिढा सोडवावा या साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. पालकमंत्री विजयकुमार देशमुख व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची त्यांनी भेट घेतली. या भेटीतही स्वाभिमानीच्या हाती काही न लागल्याने त्यांनी लोकमंगल समोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील ऊसदाराचा तिढा सोडवावा, एफआरपी 15 दिवसात बंधनकारक असतानाही जिल्ह्यातील एकाही कारखान्याने यंदाच्या हंगामात गाळप झालेल्या ऊसाचे बिल दिलेले नाही. गेल्या हंगामातील एफआरपी अधिक चारशे रुपये मिळावेत, सिध्देश्‍वर, मातोश्री लक्ष्मी शुगर आणि गोकुळ कारखान्याने एफआरपीची खोटी माहिती दिल्याचा आरोप करत या कारखान्यांची चौकशी करावी या मागण्यांसाठीही हे उपोषण होत आहे.

या मागण्यांसाठी कारखानदार, जिल्हा प्रशासन यांच्यासोबत बैठक घेण्याची विनंती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना करण्यात आली. त्यांनी विनंती मान्य केली नाही. त्यानंतर जिल्हाभर रास्तारोको करण्यात आला तरीही दखल घेतली जात नसल्याने आता आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतल्या माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. गुरुवारी सकाळी 11 वाजता या आमरण उपोषणाला सुरवात होणार आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष महामूद पटेल व समाधान फाटे, कार्याध्यक्ष शिवाजी पाटील, विजय रणदिवे आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swabhimani shetakri agitation against Lokmangal sugar factory from Thursday