सांगलीत संतप्त आंदोलकांचे दूध ओतून आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

गायीच्या दुधाला योग्य भाव मिळावा, शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा यासह उसाला हमी भाव मिळावा या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.

सांगली : गायीच्या दुधाच्या दरासह अन्य मागण्यांसाठी  सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दूध ओतत सरकारचा निषेध केला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना अडविताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यावेळी मुख्यमंत्र्याच्या नावे आंदोलकांकडून दुधाचा अभिषेकही करण्यात आला. 

गायीच्या दुधाला योग्य भाव मिळावा, शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा यासह उसाला हमी भाव मिळावा या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी या मोर्चात ऊसाबरोबर  आंदोलकांनी दूधही आणले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येताच आंदोलकांनी प्रवेशद्वारासमोरच दूध ओतून सरकारचा निषेध केला. 

यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना अटकाव केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसात झटपट झाली. 20 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महेश खराडे,संदीप राजोबा यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी पोलिस निरीक्षक प्रताप पोमण यांच्या सह पोलिस फाटा तैनात होता.

Web Title: Swabhimani Shetkari Sanghatna March in sangli