पिस्तुलाचा खरा मालक सापडला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

कोल्हापूर - येवती (ता. करवीर) येथील युवकाकडे सापडलेल्या पिस्तुलाचा खरा मालक अखेर पोलिसांना सापडला. संशयित स्वप्नील श्रीकांत शिंदे (रा. दिंडनेर्ली) याला स्थानिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान पिस्तुलाचा मालक शिंदे असल्याचे समोर आले आहे. त्याच्या अटकेची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली.

कोल्हापूर - येवती (ता. करवीर) येथील युवकाकडे सापडलेल्या पिस्तुलाचा खरा मालक अखेर पोलिसांना सापडला. संशयित स्वप्नील श्रीकांत शिंदे (रा. दिंडनेर्ली) याला स्थानिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान पिस्तुलाचा मालक शिंदे असल्याचे समोर आले आहे. त्याच्या अटकेची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली.

दोन दिवसांपासून ‘सकाळ’ने या प्रकरणाचा पाठपुरावा केल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुरुवारी दिंडनेर्ली येथे कारवाई करत देशी बनावटीचे पिस्तूल व तीन काडतुसे बाळगल्याप्रकरणी प्रवीण बंडू गुरव (रा. येवती) याला अटक केली होती. गुन्हेगारीशी दुरान्वयेही संबंध नसणारा व जेसीबीवर चालक म्हणून काम करणाऱ्या प्रवीण गुरव याच्यावरील कारवाईमुळे येवती, इस्पुर्ली, दिंडनेर्ली परिसरात खळबळ उडाली होती.

पिस्तुलाचा मालक कोण आहे हे माहित असतानाही राजकीय दबावातून गुरवला ‘बळीचा बकरा’ केल्याची चर्चा दोन दिवसांपासून परिसरात होती. ‘सकाळ’ने दबक्‍या आवाजातील चर्चा उघडपणे मांडून या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता.

वृत्ताची दखल घेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आज दिंडनेर्ली येथील स्वप्नील शिंदे या संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडील चौकशीदरम्यान तोच या पिस्तुलाचा मालक असल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, रात्री उशिरा त्याच्यावर अटकेची कारवाई होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यापुढे तरी पोलिसांनी योग्य तपास करावा, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. 

दरम्यान, प्राथमिक तपासानंतर त्याला इस्पुर्ली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्याला अटक करून त्याने पिस्तूल कधी व कोठून आणले, याचा तपास करणार असल्याची माहिती इस्पुर्ली पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक तृप्ती देशमुख यांनी दिली आहे.

‘लाख’मोलाच्या चर्चेची चौकशी होणार का?
पिस्तुलाचा मालक शिंदेच असल्याचे पोलिसांना माहीत होते; मात्र ‘लाख’मोलाची उलाढाल करून त्याला बाजूला केल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. शिंदे याच्यावरील कारवाईनंतर ‘आर्थिक उलाढाल’ करणाऱ्या पोलिसांचीही चौकशी होणार का, याची उत्सुकता ग्रामस्थांना आहे.

Web Title: swapnil Shinde arrested in Pistol case