जित्याजागत्या ‘बाहुली’ला जपलंय जिवापाड

जित्याजागत्या ‘बाहुली’ला जपलंय जिवापाड

कोल्हापूर - हिचं नाव स्वराली; पण तिच्या तोंडून एक शब्द फुटत नाही अशी स्थिती आहे. तिचं वय २२; पण तिचं सारं अंग जखडलेलं. गेली २२ वर्षे ती अंथरुणावर आहे. नजर कायम छताकडे. एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवरही ती वळू शकत नाही अशी तिची अवस्था आहे... अशा अवस्थेत २२ वर्षे पडून असलेली पोरगी म्हणजे ते घर सैरभैर झालेलं असणार असंच आपल्या मनात येणार हे साहजिकच आहे; पण वास्तव खूप वेगळं आहे. घरातली एखादी बाहुली आपल्याशी कधी बोलत नाही. कधी हट्ट करत नाही. काही मागत नाही; तरी त्या बाहुलीची आपण वेणी-फणी करतो. तिचा नट्टा-पट्टा करतो. नेमकं तसंच एक बाहुली समजून स्वरालीच्या आई व आजीनं तिला गेली २२ वर्षे जपलंय. तिच्या वाट्याला जे आलंय, ते ती सहन करते आहे; पण आजाराचं संकट कितीही मोठं असलं, तरी अजिबात सैरभैर न होता तिची आई अमृता व आजी सरोज जोशी यांनी स्वरालीला जपलंय. एखाद्या आजारी माणसाला जपायचं कसं याचा खूप वेगळा संदेश त्यांनी यातून दिला आहे.

स्वराली जन्मतः लुळी. तिची मान, मणका, कंबर लुळी असल्याने ती जन्मापासून आजपर्यंत अंथरुणातच आहे. तिला बोलता येत नाही. या कुशीवरून त्या कुशीवर वळता येत नाही. हातात कोणतीही वस्तू धरता येत नाही. अशी मुलगी जन्माला आली म्हटल्यावर ती बोजाच असे मानले गेले असते; पण स्वरालीसाठी आई अमृता व आजी सरोज यांनी गेली २२ वर्षे जिवाचे रान केले आहे. ती अशी विचित्र अंपगावस्थेत असली, तरी त्यांच्या दृष्टीने ती काळजाचा तुकडा आहे. त्यांनी तिच्यासाठी नव्या कपड्यांनी कपाट भरले आहे. तिच्या हातावर मेंदी आहे. नखे रंगवली आहेत. पायात छानसं पैंजण आहे. तिच्यासाठी टीव्ही आहे. ती फक्त डोळ्याने इशारा करते. त्या इशाऱ्यावरून तिच्या आई व आजीला तिला काय हवे, काय नको हे कळते. नवे कपडे आणले म्हटले, की तिच्या डोळ्यात आनंदाला भरते येते आणि आपली पोर या नव्या कपड्यात उभारू नव्हे, तर बसूही शकणार नाही, हे माहीत असूनही तिची आई तिला नवे फॅशनचे कपडे घालते. तिच्या गोड चेहऱ्यावर हळूच काजळाची टिकली लावते.

स्वरालीचा दुर्धर आजार हे आम्ही संकट मानत नाही. ती लुळी असेल; पण तिच्यात जीव आहे. माया आहे. तिला बोलता येत नाही; पण डोळ्यांची भाषा अजब आहे. तिच्यासाठी महिन्याला पाचसहा हजार औषधांचा खर्च येतो. आम्ही तो कसातरी भागवतो; पण ती बसू शकेल अशी खुर्ची कोणीही बनवून द्यावी, ती खुर्ची स्वरालीला खूप आधार ठरेल. स्वराली रंकाळा भागातील क्रशर चौकात केदारनाथ हॉलजवळ अनंतप्रीत अपार्टमेंटमध्ये राहते.
- सरोज जोशी,
स्वरालीची आजी

तिला हवी साधनयुक्त खुर्ची
स्वरालीचा आजार दुर्धर आहे. तिच्या मणक्‍यात ताकद नाही. मुकी आहे; पण तिला एक दिवस पायावर उभे राहायचे राहू दे; पण एकदा तरी छानपैकी एखाद्या खुर्चीत तिला बसवायचे, एवढे त्यांनी ठरवले आहे; पण जिच्या मानेला, मणक्‍याला, कंबरेच्या खुब्याला आधार नाही, त्या स्वरालीला ती त्यावर काही वेळ तरी व्यवस्थित बसेल अशी एखादी खुर्ची हवी आहे. अशी तयार खुर्ची मिळणे अवघड आहे; पण कोल्हापुरात एवढी कल्पकता आहे, की उद्यमनगरातला एखादा उद्योजक, कामगार अशी खुर्ची बनवून देईल किंवा त्यांनी बनवून द्यावी एवढीच त्यांची अपेक्षा आहे. या खुर्चीवर बसवून किंवा खुर्चीला चाके लावून कोल्हापुरातून फिरवून आणायची त्यांची खूप इच्छा आहे. स्वरालीच्या आई व आजीची ही धडपड सत्कारणी लावणे आपल्या हाती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com