
सांगली : उद्योजक नवले यांचा बुडून मृत्यू
सांगली : येथील प्रसिद्ध उद्योजक व गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर सचिन वसंतराव नवले (वय ४७, पार्श्र्वनाथ कॉलनी, धामणी रस्ता) यांचा आमराईजवळील ऑफिसर्स क्लबच्या जलतरण तलावात पोहताना हृदयविकाराच्या धक्क्यानंतर बुडून मृत्यू झाला. सचिन हे मेगा कन्स्ट्रक्शनचे संचालक व दिवंगत आमदार धुळाप्पा अण्णा नवले यांचे नातू होत. नवले यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त समजताच अनेकांना धक्का बसला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सचिन नवले हे आमराईजवळील ऑफिसर्स क्लबचे सदस्य आहेत. क्लबच्या पहिल्या मजल्यावरील जलतरण तलावात ते नेहमी पोहायला येत होते. श्री. नवले हे आज पोहण्यासाठी सकाळी साडेआठच्या सुमारास आले होते. त्यांच्या सोबत मुलगा देखील पोहण्यास शिकण्यासाठी आला होता. पहिल्या मजल्यावरील तलावात पोहत असताना फारसे कोणी नव्हते. पोहताना श्री. नवले यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. त्यामुळे ते पाण्यात बुडाले. श्री. नवले यांना पोहून बाहेर येण्यास उशीर झाल्यामुळे क्लबचे कर्मचारी तलावाजवळ आले. तेव्हा त्यांना ते बुडाल्याचे निदर्शनास आले.
तातडीने ‘१०८’ रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. त्यांना एका खासगी रुग्णालयात नेले. तेथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले. सिव्हिलमध्ये दाखल करेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. नवले यांच्या निधनाचे वृत्त समजताच नातेवाईक व मित्र सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जमले. शहर पोलिस ठाण्यात याबाबत नोंद झाली आहे. श्री. नवले यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. नवले मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला.
Web Title: Swimming Pool Drowned Sangli
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..