स्वाइन फ्लू नमुन्याची सोलापुरात तपासणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑगस्ट 2016

सोलापूर - विषाणूपासून होणाऱ्या स्वाइन फ्लूसारख्या आजारांच्या नमुन्याची तपासणी डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात होणार आहे. इंडियन मेडिकल कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने महाविद्यालयात नमुने तपासणी केंद्राला मंजुरी दिली आहे. सहा महिन्यांत ही सुविधा सुरू होईल. मुंबई-पुण्यानंतर ही सुविधा सोलापुरात उपलब्ध होत असल्याची माहिती महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. किशोर इंगोले यांनी दिली.

जिल्ह्यामध्ये या आजाराच्या नमुन्याची तपासणी करण्याची सोय नसल्यामुळे पुणे येथील प्रयोगशाळेवर अवलंबून राहावे लागत आहे. तेथून नमुन्याचा अहवाल येण्यासाठी तीन दिवसांचा अवधी लागतो. यामुळे रुग्णालयात दाखल संशयिताच्या उपचाराची दिशा ठरविताना वेळ वाया जातो. यातून उपचार उशिरा सुरू झाल्यास रुग्ण दगावण्याची शक्‍यताही वाढते.

शासकीय महाविद्यालयाकडून अशा प्रकारच्या नमुना तपासणीची सोय उपलब्ध व्हावी, यासाठीचा प्रस्ताव महाविद्यालयाने पाठविला होता. डॉ. इंगोले यांनी अहमदाबाद येथे याबाबतचे प्रशिक्षण घेतले आहे. यासाठी आवश्‍यक ती यंत्रणा उभारली आहे. त्या यंत्रणेच्या परीक्षणासाठी आयसीएमआरचे तज्ज्ञ येणार आहेत.

स्वाइन फ्लूबरोबरच इन्फ्लुएन्झा, क्षयरोग, चिकुनगुणिया, हेपिटायटस ए, हेपिटायटस बी, कॉलरा यासारख्या आजारांच्या नमुन्याची तपासणी शक्‍य होणार आहे. ही नमुना तपासणी आरटीपीसीआर (रिअल टाईम पॉलिमर्स चेन रिऍक्‍शन) या यंत्राच्या मदतीने करण्यात येणार आहे. यापूर्वी पुण्याच्या प्रयोगशाळेतील एका यंत्रातून एकावेळी आठ ते 10 नमुने तपासता येत होते. त्याचा अहवाल येण्यासाठी सहा ते आठ तास लागत होते. मात्र आरटीपीसीआरमधून एकावेळी 70 ते 80 नमुना तपासणीचा अहवाल दोन तासांमध्ये मिळणार आहे. ही अद्ययावत मशिन सोलापुरात दाखल झाल्यास विषाणूंद्वारे होणाऱ्या आजारावर नियंत्रण मिळविणे शक्‍य होणार आहे. 

Web Title: Swine flu sample inspection Solapur