नुने गावच्या मुलांना लागला सय्यद चाचांचा लळा

Sayaad Chacha
Sayaad Chacha

नागठाणे : सय्यद चाचा म्हणजे मुलांचे आवडते व्यक्तिमत्त्व. ते मुलांना युद्धाच्या गोष्टी सांगतात. शौर्याचे रंगतदार किस्से सांगतात. मुलांचे मनोरंजन करतात. पर्यावरणाचे संस्कार त्यांच्यावर बिंबवतात. त्यामुळेच, की काय मुलांना जणू सय्यद चाचांचा लळाच लागला आहे.
 
सय्यद चाचा म्हणजेच लतिफ सय्यद. सातारा तालुक्‍यातील नुने गावचे ते रहिवासी. त्यांनी वयाची ऐंशी ओलांडली आहे. मात्र ते अजूनही तितकेच तरतरीत, उत्साही आहेत. चाचांचे आयुष्य लष्करी सेवेत गेले. आपोआपच त्यांच्या जीवनाला शिस्त लागली. ती आजदेखील कायम आहे. निवृत्तीनंतर ते गावी आले. मुलामाणसांत रमले. शेती हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. 1977 पासून ते शेतीत रमले आहेत.

गावापासून काही अंतरावरच त्यांची शेती आहे. आजवर त्यांनी दोनशेहून अधिक झाडे लावली. ती यशस्वीपणे वाढविलीही आहेत. त्यात आंबा, नारळ, चिकू, केळी, रामफळ, सीताफळ अशा कित्येक फळझाडांचा समावेश आहे. चाचांचे जसे झाडांवर प्रेम, तसेच मुलांवरही. गावालगत नुने गावठाण ही प्राथमिक शाळा आहे. प्रियांका सावंत अन्‌ लीना पोटे या उपक्रमशील शिक्षिका येथे कार्यरत आहेत. चाचा या शाळेत नेहमी येतात. आठवड्यातून त्यांची एखादी तरी भेट हमखास ठरलेली असतेच.

शाळेत आले, की ते मुलांशी गप्पागोष्टी करतात. मुलांना लष्करातील किस्से सांगतात. भारत व चीन यांच्यातील युद्धाचे प्रसंग सांगतात. शाब्दिक कोडी सांगून मुलांची जिज्ञासा वाढवितात. ते स्वतः देशभर हिंडले आहेत. तिथली माहिती ते मुलांना देतात. त्यामुळे मुलांच्या ज्ञानात भर पडते. त्यांचे सामान्यज्ञान वाढते. चाचांचा मूळचा स्वभाव विनोदबुद्धीचा. त्यामुळे मुलांचे मनोरंजक होते. चाचा आले, की मुले एकदम खूष. उल्लेखनीय म्हणजे ते स्वतः मोबाईलपासून दूर आहेत. त्यांची सहचारिणीदेखील शाळेतील मुलांवर तितकीच प्रेम करते. 

शाळेस हातभार... 

चाचा शाळेस सातत्याने मदत करतात. फुलझाडांची भेट देतात. स्वतः शालेय परिसरात झाडे लावतात. त्यांची देखभाल करतात. शाळेस एखादी गरजेची वस्तू हवी असेल तरीही देतात. त्यामुळे नुने गावठाण शाळा अन्‌ सय्यद चाचा हे जणू समीकरणच बनले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com