एस.पी. साहेब चोरट्यांचा बंदोबस्त करा 

राजेश मोरे
सोमवार, 22 मे 2017

कोल्हापूर - शहरात चोऱ्या, घरफोड्या, चेन स्नेचिंगसह लुटीमारीचे प्रकार एकामागोमाग एक घडू लागलेत. "पोलिस ठाण्यातच गस्त नावालाच' असे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. जोमात असणाऱ्या चोरट्यांमुळे शहरवासियांची झोप उडाल्याने एस.पी. साहेब चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी तातडीने उपाययोजना करा, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे. 

कोल्हापूर - शहरात चोऱ्या, घरफोड्या, चेन स्नेचिंगसह लुटीमारीचे प्रकार एकामागोमाग एक घडू लागलेत. "पोलिस ठाण्यातच गस्त नावालाच' असे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. जोमात असणाऱ्या चोरट्यांमुळे शहरवासियांची झोप उडाल्याने एस.पी. साहेब चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी तातडीने उपाययोजना करा, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे. 

गेल्या सहा महिन्यात चोरी, घरफोडी, चेन स्नेचिंगचे प्रकार शहर व परिसरात वाढू लागले आहेत. त्यात लुटमारांनी डोके वर काढले आहे. गजबजलेल्या ताराबाई रोडवरील सराफ पेढीवर दोन चोरट्यांनी लाखोंचा डल्ला मारला. त्याचा छडा लावण्यात अद्याप जुना राजवाडा पोलिसांना यश आले नाही. गेल्या काही दिपसापूर्वी सानेगुरुजी वसहात येथील रावजी मंगल कार्यालय परिसरातून एका महिलेचे तब्बल 16 तोळे दागिने मोटारसायकल चोरट्याने हिसकावून नेले. करवीर नगर वाचन मंदिर परिसरातील मोपेडची डिक्की फोडून त्यातील किंमती ऐवज लंपास केला. पाच बंगला परिसरातील कापड दुकानातून सात तोळे दागिने व 30 हजाराची रोकड चोरट्याने लंपास केली. तावडे हॉटेल ते मार्केट यार्ड रस्त्यावर तिघा लुटारूंनी अनेकांना मारहाण करून लुटले. कालच लक्ष्मीपुरीतील मोबाईल शॉपी आणि मेडिकल दुकान फोडून चोरट्याने सुमारे दीड लाखाचा ऐवज लंपास केला. 

मध्यवर्ती बसस्थानकात आज एका महिला प्रवासीच्या पर्समधील सहा तोळे आणि कसबा बावडा येथे भाजी खरेदी करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्याचे गंठन चोरट्याने हातोहात लंपास केले. तसेच शहर व परिसरातील बंद घरावर चोरट्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या चोरीचे प्रकार दररोज घडत आहेत. लक्ष्मीपुरी आठवडी बाजारात तर एक दोन मोबाईल चोरीला जाणे ही नित्याची बाब बनली आहे. बदल्या, पेंडींग कामांच्या नावाखाली पोलिस ठाण्यातच असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. चौकात अगर गर्दीच्या रस्त्यावर पोलिस दिसले की घडणाऱ्या अनेक गुन्ह्यांना चाप बसतो. हे तत्कालीन पोलिस अधीक्षक आर. के. पद्मनाभन यांच्याकाळात चौकाचौकात पोलिस दिसत होते. मात्र त्यांच्या बदलीनंतर त्यात खंड पडला. शहरात सेफ सिटी अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तरीही चोरटे अद्याप पोलिसांच्या हाती लागत नाहीत ही वस्तूस्थिती आहे. नूतन पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी चोऱ्या, चेन स्नेचिंग, घरफोड्या यांची गांभीर्यांने दखल घ्यावी. शहरातील मुख्य चौकात, गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचे वास्तव्य वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांतून अपेक्षा व्यक्त होत आहे. 

Web Title: Take immediate measures for the protection of the thieves