सहलीसाठी "एसटी बस' मिळेल हो... 

दौलत झावरे 
बुधवार, 4 डिसेंबर 2019

आता नव्याने "एसटी आपल्या दारी' हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून एसटीचे अधिकारी शाळांना भेटी देऊन त्यांना सहलीसाठी एसटीचा अवलंब करण्याचे आवाहन करीत आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

नगर ः "बहुजन हिताय, बहुजन सुखाय' या ब्रीदवाक्‍यानुसारच एसटीचा कारभार अविरतपणे सुरू आहे. नगर विभागातर्फे प्रवाशांचा प्रतिसाद वाढविण्यासाठी नवीन उपक्रम राबविण्यात येत असून, आता नव्याने "एसटी आपल्या दारी' हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून एसटीचे अधिकारी शाळांना भेटी देऊन त्यांना सहलीसाठी एसटीचा अवलंब करण्याचे आवाहन करीत आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

शंभर शाळांच्या भेटी 
जिल्ह्यातील शाळांनी सहलींसाठी एसटी बसचा उपयोग करावा, यासाठी आता राज्य परिवहन महामंडळाच्या नगर विभागाचे अधिकारी व कर्मचारी शाळांना भेटी देऊन एसटीच्या ध्येयधोरणांचा प्रचार व प्रसार करीत आहेत. विभागनियंत्रक कार्यालयासह जिल्ह्यातील अकरा आगारांच्या माध्यमातून एकूण 40 पथके शाळांना भेट देऊन तेथील मुख्याध्यापकांसह शिक्षकांशी चर्चा करून त्यांना, एसटीनेच सहली न्याव्यात, असे आवाहन करीत आहेत. जिल्ह्यातील सुमारे 100 शाळांशी अधिकाऱ्यांनी थेट संपर्क साधून, एसटीचे महत्त्व पटवून देऊन सहलीसाठी एसटी बसचा वापर करावा, असे सांगितले आहेत. सहल नेमकी कोठे काढली पाहिजे, तेथे कोणते पर्यटनक्षेत्र आहे, तीर्थक्षेत्रे कोठे कोठे आहेत, याबाबत माहितीही अधिकारी शाळांना देत आहेत. 

शाळांकडून प्रतिसाद 
पहिल्या टप्प्यात 600 शाळांना भेट देण्याचे नियोजन आहे. उर्वरित शाळांना दुसऱ्या टप्प्यात भेट देण्यात येईल. मात्र, जिल्ह्यातील सर्वच शाळांशी त्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यालाही शाळांकडून प्रतिसाद मिळू लागला आहे. शाळांच्या सहलींच्या नियमांमध्येही काही बदल झाले आहेत. 

परराज्यांतील सहलींसाठीही... 
शाळांच्या परराज्यांतील सहलींसाठीही एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. भोपाळला एका शाळेची सहल गेली असून, त्यांना 15 शिवशाही बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

शाळांना भेटी देत आहोत 
"एसटी आपल्या दारी' उपक्रमाला जिल्ह्यातील शाळांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आम्ही सर्वच शाळांना भेट देऊन त्यांना सहलींसाठी एसटी बसचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन करीत आहोत. 
- विजय गिते, विभागनियंत्रक 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take "ST" for a trip ...