तलाठ्याने चक्क सैनिकाकडेच मागितली लाच

महसूलची लाचखोरी; नोंदी करायला लाच हाच पायंडा
Bribe
Bribesakal

सांगली - सर्कल, तलाठी, कोतवाल... सगळेच अण्णासाहेब... त्यांना साहेब म्हणायची लाज वाटते, त्यांनी तर ती कधीच सोडलीय... शेतकरी बाप मरतो, पोरगा वारस नोंद करायला जातो... त्याच्याकडे दहा अन् पंधरा हजारांची लाच मागता... आमचा बाप मेलाय आणि आम्ही त्याचे वारस आहोत, हे सरकार दरबारी नोंदवायला आम्ही का लाच द्यायची? असतील तुमच्यातले काही चोख, प्रामाणिक... त्यांच्याबद्दल तक्रार नाही, पण पैशाला सोकावलेल्या बोक्यांच्या पाठीत आता रट्टा मारायला वेळ आली आहे. त्याची नव्याने सुरुवात देशिंगमधून झाली आहे.

‘एकदाही निलंबित झाला नाही, तो तलाठी कसला’, अशी नवी म्हण तयार करावी लागेल, अशीच परिस्थिती तयार झाली आहे. महसूल विभागातील ही प्रारंभिक कीड आहे. सगळेच तलाठी असे आहेत, असा अजिबात दावा नाही. काही लोक प्रामाणिक आहेत, ज्याने-त्याने आपल्या छातीवर हात ठेवून आपला प्रामाणिकपणा तपासून घ्यावा. गावाची जितकी करता येईल तितकी लूट करण्याचा धंदा मांडलेल्यांना मात्र आता वठणीवर आणायची गरज आहे. सात-बारा उतारा हवाय, आधी ‘नंदी’ची म्हणजे कोतवालाची भरती करा. शासकीय नियम किती? हा बहाद्दर पैसे मागतोय किती? ‘तत्काळ’चा रेट वेगळाच. नोंद करायला तर फेरे किती घालायचे. आधी तलाठी कार्यालयाचे उंबरे झिजवायचे, तिथून फाईल पुढे गेली की सर्कल कार्यालयात त्रुटींचे रतीब सुरू होते. एकेक दोष काढून पिळून काढले जाते. प्रत्येक ठिकाणी एजंट नेमला आहे. तो नाही, असा कुणाचा दावा असेल तर लोक त्यालाही चौकात उभा करायला तयार आहेत. ‘अण्णासाहेब, बसूया, ठरवूया’, असे म्हटल्याशिवाय पुढे कामच सुरू होत नाही.

देशिंगमध्ये रंगेहाथ सापडलेला तलाठी तर, चक्क फौजीकडून २५ हजारांची लाच घेत होता. देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी आयुष्य वेचलं, त्या माणसाला स्वतःच्या मालमत्तेची नोंद घालण्यासाठी या चोरांचे घर का भरायचे? हा तलाठी म्हणतो, माझा भाऊ फौजी आहे... मग, फौजीकडून लाच मागतोच कशी? ‘आमची सिस्टीम वेगळी हाय’, या वाक्याचा अर्थ काय? यामध्ये कोण-कोण आहे? कुणाला किती वाटा जातो? या सगळ्याचा शोध कधीच लागणार नाही. सध्या ‘ईडी’ची सगळीकडे चर्चा आहे. या संस्थेने राजकीय फायद्या-तोट्याच्या हिशेबाने काम करण्यापेक्षा सामान्यांना नागवणाऱ्या अशा भ्रष्टांच्या मालमत्तांची चौकशी करण्याची गरज आहे.

डोंगर पोखरून उंदीर मोकाट...

जिल्ह्याच्या अनेक गावांतील डोंगर सपाट झाले आहेत. गायरानच्या जमिनींत प्रचंड मोठी तळी तयार झाली आहेत. काय घडले इथे? इथला सगळा मुरूम, दगड गेले कुठे? त्याची रॉयल्टी भरलीय का? या सगळ्याची चौकशी झाली, तर अण्णासाहेबांचा खिसा कसा गरम झाला आहे, याची उत्तरे मिळतील. फक्त मुरुमाच्या हप्त्याची रक्कम लाखांच्या पटीत होईल. त्याची कुणी माहिती दिली, तर त्याचीच ‘सुपारी’ देणारी यंत्रणा महसूल विभागात काम करतेय, याचे उदाहरण कडेगावमध्ये सगळ्यांनी पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com