तमदलगेतील शेतीला बंधाऱ्यांचे सिंचन

- सुनील पाटील
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

तमदलगेत दोन वर्षांपूर्वी पाटबंधारे विभागाने बंधारे बांधले. ते बंधारे यंदा तुडुंब भरले. सभोवतालच्या शेतीबरोबरच बंधाऱ्यालागतच्या विहिरी व कूपनलिकांचे पाणी त्यामुळे समाधानकारक राहिले. त्याचा फायदा सुमारे साठ हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांना झाला.

तमदलगेत दोन वर्षांपूर्वी पाटबंधारे विभागाने बंधारे बांधले. ते बंधारे यंदा तुडुंब भरले. सभोवतालच्या शेतीबरोबरच बंधाऱ्यालागतच्या विहिरी व कूपनलिकांचे पाणी त्यामुळे समाधानकारक राहिले. त्याचा फायदा सुमारे साठ हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांना झाला.

राज्यातील मुबलक पावसाचा जिल्हा ही कोल्हापूरची ओळख; मात्र याच जिल्ह्यातील काही गावांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. ‘नदी उशाला आणि कोरड घशाला’ अशी परिस्थिती जिल्ह्यातील अनेक गावांवर ओढवते. यापैकीच तमदलगे (ता. शिरोळ) हे गाव. शेजारी डोंगर असूनही हे गाव पाण्यासाठी नेहमीच तहानलेले; मात्र याच गावात आता शेती आता ठिबक व सिमेंट बंधाऱ्यांच्या आधारावर भिजत आहे. 

शिरोळ तालुक्‍यात कमी पाऊस पडत असला तरी भोवतालच्या नद्यांमुळे तालुक्‍यातील गावांना पाण्याची कमतरता भासत नाही. तमलदगे मात्र याला अपवाद. शेतीसाठी सोडाच; पण पिण्याच्या पाण्यासाठी पावसाळ्यात झगडावे लागते; मात्र असे असतानाही उत्तम शेती पिकविण्याचे धाडस शेतकऱ्यांनी केले आहे. तमदलगेची लोकसंख्या अडीच ते तीन हजार. ८९२ हेक्‍टरमध्ये गावचे क्षेत्र. यापैकी ४६२ हेक्‍टर क्षेत्र वनाखाली. ४३० हेक्‍टर पिकावू क्षेत्रापैकी ७५ हेक्‍टर बागायत तर ३५५ हेक्‍टर क्षेत्र कोरडवाहू जमीन आहे. पाझर तलावामुळे कूपनलिकांना पाणी असते. गेल्या दोन वर्षांत सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केवळ १३२ मि.मी. पावसाची नोंद झाली. १५ सप्टेंबर अखेर पर्यंत २२५ मि.मी. पावसाची नोंद आणि २२५ मि.मी. पाऊस नोंद झाली असली तरी तमदलगेत मात्र पाऊस कमीच. त्यामुळे बंधाऱ्यात जे पाणी आहे आहे तेच पुरवून वापरावे लागणार. गेल्या पाच-सहा वर्षांत पाझर तलावही न भरल्याने गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण भटकावे लागत होते. यंदा पाऊस चांगला झाला. कूपनलिकेला पाणी आहे. दोन वर्षांपूर्वी गावात पाटबंधारे विभागाने बंधारे बांधले; मात्र बंधारे तुडुंब भरले यंदाच. सभोवतालच्या शेतीबरोबरच बंधाऱ्यालागतच्या विहिरी व कूपनलिकांचे पाणी समाधानाकारक राहिल्याने त्याचा फायदा सुमारे साठ हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांना झाला. या क्षेत्रात सोयाबीन, भुईमूग, डाळिंब, मूग, उडीद, फुलशेती चवळी, ज्वारीची पिके घेतली आहेत.

या गावांत शासनाने कोरडवाहू अभियान राबविले. गेल्या वर्षी यासाठी ५० लाखांहून अधिक रुपये खर्च झाले. लोकसहभागातून अनेक कामे झाली. या माध्यमातून सिंमेट बंधारे, विद्युत मोटरी, प्लॅस्टिक क्रेट, शेडनेट हाऊस, शेततळ्यांचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला आहे.

शेतकऱ्यांचे पंचवीस गट आम्ही स्थापन केले आहेत. शेतीशाळा घेतली जाते. शेततळी व ठिबक सिंचनास प्राधान्य दिले आहे. त्याचा फायदा शेतीला होत आहे. भविष्यात शंभर टक्के शेती क्षेत्र ठिबक खाली  आणण्याचा प्रयत्न आहे.

-एस. जी. कांबळे, कृषिसहायक, तमदलगे

Web Title: tamdalage agriculture farm irrigation jocko