आमदार बबनदादांच्या शिवसेना प्रवेशास 'या' मंत्र्याचा अडथळा

आमदार बबनदादांच्या शिवसेना प्रवेशास 'या' मंत्र्याचा अडथळा

सोलापूर : करमाळ्यात रश्‍मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर बार्शीचे आमदार दिलीप सोपल व माजी आमदार दिलीप माने यांचाही शिवसेना प्रवेश निश्‍चित झाला आहे. मात्र, आमदार बबनराव शिंदे यांना स्थानिकांसह सावंत कुटुंबाचा विरोध असल्याने त्यांचा प्रवेश तूर्तास लांबणीवर पडल्याची चर्चा आहे. तर आमदार भारत भालके यांना जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांचा अडथळा असल्याने त्यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. 

मागील विधानसभा निवडणुकीचा अंदाज पाहता शिवसेनेने स्वबळाची तयारी ठेवत इच्छुकांना निवडणूक लढण्याची तयारी ठेवा असे सांगितले आहे. तानाजी सावंत यांनी बहुमत नसतानाही आमदारकी मिळविली, त्यानंतर कॅबिनेट मंत्रिपद, सोलापूर जिल्ह्याचे सहपालकमंत्री व सोलापूर, उस्मानाबादचे संपर्कप्रमुखपद मिळविले.

दरम्यान, या पार्श्‍वभूमीवर आता सावंत यांनी 50 आमदार निवडून आणण्याची जबाबदारी घेतली असून त्यात सोलापुरातील सात जागांचा समावेश आहे. त्यादृष्टीने त्यांनी कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील दिग्गज परंतु, पक्षाबद्दल नाराज असलेल्यांना शिवेसेनेत प्रवेश दिला. मात्र, स्वत:च्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देण्याच्या उद्देशाने सावंत यांनी माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांना पक्ष प्रवेश नाकारल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीत संजय शिंदे यांना माढ्यातून मिळालेले मताधिक्‍य, बबनराव शिंदे यांची घटती लोकप्रियता, शिवसेना- भाजपकडे झुकलेले जनमत, शिंदे कुटुंबीयांवरील आरोप याचा विचार करून त्यांचा शिवसेना पक्ष प्रवेश लांबणीवर पडल्याची चर्चा आहे. 

तानाजी सावंतांनी घेतली सात मतदारसंघांची जबाबदारी 
आगामी विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, बार्शी, माढा, मोहोळ, मंगळवेढा व शहर मध्य या मतदारसंघात शिवसेनेचेच आमदार निवडून येतील, असा विश्‍वास जलसंपदामंत्री तथा शिवसेनेचे संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्‍त केला आहे. त्याची जबाबदारी सावंत यांनी स्वत: उचलली आहे. युती न झाल्यास दक्षिण सोलापूर तालुक्‍यातही शिवसेनेचाच उमदेवार विजयी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

राजेंद्र राऊत यांची पक्षांतराची चर्चा अन्‌ सोपलांची खेळी 
शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये तर तिथून भाजपत प्रवेश केलेल्या माजी आमदार राजेंद्र राऊत शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान, लोकसभेच्या निकालानंतर कॉंग्रेस- राष्ट्रवादीतून आपण निवडून येणार नाही, याचा अंदाज घेऊन आमदार दिलीप सोपल यांनी राऊत यांच्या अगोदर शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उमेदवारी मिळेल या आशेने भाजपत प्रवेश केलेले राऊत आता काय भूमिका घेणार याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री सहायता निधीतून राऊत यांनी कोट्यवधींची कामे मतदारसंघात सुरू केली आहेत परंतु, युती झाल्यास बार्शीची जागा शिवसेनेकडे राहणार असल्याने राऊत यांची कोंडी होणार, हे निश्‍चित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com