काळ आला होता पण... मोलॅलिस भरलेला टॅंकर विद्युत पोलवर आदळला अन

शिवकुमार पाटील
Tuesday, 23 February 2021

धडक इतकी मोठी होती, की एका पोलला धडकल्याने तीन पोल पडले. टॅंकर रस्त्याकडेला जावून शेतात जाऊन पल्टी झाला. चालकाचे प्राण वाचले.

किल्लेमच्छिंद्रगड (जि. सांगली) : कृष्णा कारखाना ते इस्लामपूर रस्त्यावर नरसिंहपूर (ता. वाळवा) येथे बहे पुलाच्या तोंडाशी असलेल्या विद्युत वाहिनीच्या पोलवर इस्लामपूरकडे मोलॅसिस घेऊन जाणारा टॅंकर धडकला.

आज दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. धडक इतकी मोठी होती, की एका पोलला धडकल्याने तीन पोल पडले. टॅंकर रस्त्याकडेला जावून शेतात जाऊन पल्टी झाला. चालकाचे प्राण वाचले. मात्र भीतीपोटी त्याने धूम ठोकली. 

मिळालेली माहिती अशी, की अपघातानंतर टॅंकरमधून मोलॅसिसची गळती सुरू झाली. विद्युत पुरवठा सुरू असता तर मोलॅसिसने पेट घेवून उद्‌भवलेल्या आगीमुळे अनर्थ घडला असता. सुदैवाने विद्युत पुरवठा बंद होता. रस्त्यांच्या पश्‍चिमेस आईस्क्रिम, भेळ विकणाऱ्यांच्या तसेच रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांना धोका झाला असता. काळ आला होता पण... असेच म्हटले जात आहे. 

कोणतीही गंभीर तसेच जीवित हानी होण्याचा प्रकार घडला नाही. चालक नशेत असल्यामुळे अपघात झाला असण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

येडेमच्छिंद्रपासून बहे पुलापर्यंत असलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीद्वारे नरसिंहपूर येथील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाना वीजपुरवठा केला जातो. या वाहिनीच्या पुलाशेजारील शेवटच्या पोलवर टॅंकर आदळण्याची घटना घडून तीन पोलचे नुकसान झाल्याने दुरुस्तीचे काम होईपर्यंत कृषी पंपाना विद्युत पुरवठा खंडित राहण्याची समस्या राहणार आहे 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tanker full of molasses collided with an electric pole at killemachindragad