तनपुरे साखर कारखान्यावर नगर जिल्हा बॅंकेची जप्ती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

88 कोटींचे थकीत कर्ज; तहसीलदारांची कारवाई
राहुरी फॅक्‍टरी - तनपुरे सहकारी साखर कारखान्यातील यंत्रसामग्रीसह सर्व चल, अचल मालमत्ता आज जप्त करून नगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या ताब्यात देण्यात आली. बॅंकेच्या सुमारे 88 कोटी रुपयांच्या थकीत कर्जापोटी राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे यांनी ही कारवाई केली.

88 कोटींचे थकीत कर्ज; तहसीलदारांची कारवाई
राहुरी फॅक्‍टरी - तनपुरे सहकारी साखर कारखान्यातील यंत्रसामग्रीसह सर्व चल, अचल मालमत्ता आज जप्त करून नगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या ताब्यात देण्यात आली. बॅंकेच्या सुमारे 88 कोटी रुपयांच्या थकीत कर्जापोटी राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे यांनी ही कारवाई केली.

दौंडे व बॅंकेचे पथक सकाळी अकरा वाजता कारखान्यावर आले. बॅंक व कारखाना यांच्या समन्वयाने कारवाई झाल्याने जप्तीला विरोध झाला नाही. कारखान्याचे कार्यकारी संचालक दत्तात्रेय मरकड यांनी जप्तीच्या कागदपत्रांवर सह्या केल्या. पंचनामा करून बॅंकेचे प्राधिकृत अधिकारी सिद्धार्थ वाघमारे, बाळासाहेब भोसले, किशोर भिंगारकर यांच्या पथकाने कारखान्याच्या मालमत्तेचा ताबा घेतला. कारखान्याचे संचालक विजय डौले, मच्छिंद्र तांबे, दत्तात्रेय ढूस या वेळी उपस्थित होते.

कारखान्याचे मुख्य प्रवेशद्वार व केंद्रीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जप्तीचे फलक लावण्यात आले. सप्टेंबर 2014पासून जप्तीचे प्रयत्न सुरू होते. सभासद, कामगार व संचालक मंडळ यांच्या विरोधामुळे कारवाई पुढे ढकलावी लागत होती.

डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे कारखान्याची सूत्रे आल्यापासून, कर्जाच्या पुनर्गठनासाठी प्रयत्न सुरू होते. राज्य सहकारी बॅंकेने नाशिकच्या वसंतदादा पाटील साखर कारखान्याच्या थकीत कर्जाचे दोन वर्षांपूर्वी पुनर्गठन केले. तसाच प्रस्ताव तनपुरे कारखान्याने जिल्हा बॅंकेसमोर ठेवला आहे. आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पुढाकाराने बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर व संचालक मंडळाने या प्रस्तावास नुकताच हिरवा कंदील दाखविला. त्यामुळे कायद्यानुसार अटळ असलेली कारखाना जप्तीची प्रक्रिया सुकर झाली.

कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील म्हणाले, 'थकीत कर्जाचे पुनर्गठन करून 10 हप्ते करावेत, असा प्रस्ताव जिल्हा बॅंकेसमोर ठेवला आहे. बॅंकेच्या संचालक मंडळाच्या येत्या सभेत हा विषय घेतला जाईल. पुनर्गठन होताच हंगाम सुरू करण्यासाठी जप्त केलेली मालमत्ता बॅंकेतर्फे कारखान्याच्या संचालक मंडळाच्या ताब्यात दिली जाईल.''

काय काय जप्त केले?
तनपुरे कारखान्याची यंत्रसामग्री, सर्व गोदामे, केंद्रीय कार्यालय इमारत, आसवनी प्रकल्प, पेपर मिल व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत, कामगार वसाहत, अतिथिगृह, मंगल कार्यालयाची इमारत, खुले नाट्यगृह, पेट्रोल पंप, केन यार्ड, कारखान्याच्या मालकीची सर्व वाहने, बॅंकेकडे तारण असलेली चिंचविहिरे व देवळाली प्रवरा शिवारातील जमीन.

Web Title: tanpure sugar factory seized by nagar district bank