तारळी धरणावर तरुणाईची हुल्लडबाजी 

यशवंतदत्त बेंद्रे
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

तारळे - तारळी धरण "पिकनिक स्पॉट' म्हणून उदयास आला आहे. मात्र, हुल्लडबाज तरुणाईमुळे परिसराला गालबोट लागत आहे. अनेक प्रेमी युगुलांमुळे "लव्हर्स पॉइंट' म्हणूनही तरुणाईमध्ये प्रसिद्ध होताना दिसत आहे. ही तरुणाई, लहान मुले, पर्यटक धोकादायकपणे धरणाच्या भिंतीवर प्रवेश करत आहेत. व्यवस्थापनाला हे तरुण जुमानत नसल्यामुळे येथे बंदोबस्ताची गरज आहे. या हुल्लडबाजांचा स्थानिकांनाही त्रास होत असतो. 

तारळी धरणावर गेल्या काही वर्षांत शनिवार, रविवार व सुटीच्या दिवशी पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. शेजारी समर्थस्थापित रामघळ आहे. धरणाच्या पश्‍चिमेला घनदाट वनराई आहे. अनेक छोटे- मोठे धबधबे पर्यटकांना साद घालत आहेत. अतिशय लोभस निसर्गाच्या साधन संपत्तीने नटलेल्या डोंगराच्या कुशीत साकारलेला प्रकल्प तरुणाईला आकर्षित करू लागला आहे. येथे मिळणाऱ्या एकांतामुळे अनेक प्रेमीयुगुले मोठ्या संख्येने येत आहेत. त्यांच्या रासलीलांनी परिसराला गालबोट लागत आहे, तर अनेक हुल्लडबाज आपला जीव धोक्‍यात घालून धरणाच्या भिंतीला असलेल्या तारेच्या कुंपनातून भिंतीवर प्रवेश करत आहेत. तारेच्या कुंपनातील अरुंद जागेतून जाताना त्यात अडकला अथवा पडला तर तो थेट जलाशयात किंवा कडेच्या दगडांवर पडण्याचा धोका आहे. त्यात जीव जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, तरीही धोकादायक प्रवेश सुरू आहेत. धरण व्यवस्थापनाचे कर्मचारी त्यांना हटकतात. मात्र, ते लोक त्यांना जुमानत नाहीत. काहींना भिंतीवर प्रवेश करणे "थ्रील' वाटत आहे. अशांचा अटकाव झाला पाहिजे, यासाठी बंदोबस्ताची गरज आहे. तर प्रकल्पाच्या सुरक्षिततेसाठी व अशा हुल्लडबाजांना पिटाळण्यासाठी कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी होत आहे. 

""तारळी धरणावर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यात तरुणाईची संख्या लक्षणीय आहे. हे तरुण धरणावर, तसेच रस्त्यानेही हुल्लडबाजी करतात. त्यांचा स्थानिकांना त्रास होत आहे. अशांचा बंदोबस्त संबंधित यंत्रणेने करावा.'' 
- विकास मेष्टे,उपसरपंच, मुरुड 

""धरणावर सुरक्षारक्षकांची तरतूद केलेली आहे. येत्या आठ- दहा दिवसांत सुरक्षा रक्षक नेमला जाईल. धोकादायक प्रवेश करणाऱ्यांवर, तसेच हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.'' 
- शशिकांत गायकवाड, कार्यकारी अभियंता, तारळी धरण

Web Title: Tarali dam picnic spot