गावगाड्याच्या आठवणी पुन्हा बोलक्‍या

यशवंतदत्त बेंद्रे
शुक्रवार, 22 जून 2018

तारळे - तारळी धरणाची पाणीपातळी खालावल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गडप झालेल्या गावांचे अवशेष दृष्टीस पडू लागले आहेत. येथील गावगाड्याच्या जुन्या आठवणी नव्याने जाग्या झाल्याच्या बोलक्‍या प्रतिक्रिया येथे येणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांमधून उमटत आहेत. 

तारळे - तारळी धरणाची पाणीपातळी खालावल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गडप झालेल्या गावांचे अवशेष दृष्टीस पडू लागले आहेत. येथील गावगाड्याच्या जुन्या आठवणी नव्याने जाग्या झाल्याच्या बोलक्‍या प्रतिक्रिया येथे येणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांमधून उमटत आहेत. 

तारळी नदीवर मुरुड येथे युती शासनाच्या प्रयत्नातून सिमेंट वाळूच्या सहाय्याने संपूर्ण दगडात धरणाच्या भिंतीचे काम झाले. सुमारे ७३ मीटर उंच व एक किलोमीटर लांबीची भिंत असलेल्या या धरणाची पाणी साठवण क्षमता ५.८५ टीएमसी आहे. या धरणाच्या पाण्यावर पाटण, कऱ्हाड, सातारा, खटाव आणि माणमधील एकूण १४ हजार २७६ हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्याच्या उपसा सिंचन योजनांची कामे प्रगतिपथावर आहेत.

पण, या धरणामुळे पाटण व सातारा तालुक्‍यांतील गावांना विस्थापित व्हावे लागले. यामध्ये निवडे, सावरघर, भांबे, कुशी, करंजोशी, बोपोशी, डांगिष्टेवाडी, दुडेवाडी आदी गावे पूर्णतः बाधित तर जांभे, चिखली व ठोसेघर अंशतः बाधित झाली. या गावांचे पाटण, कऱ्हाड, सातारा व खटाव तालुक्‍यांत पुनर्वसन झाले. त्यांचे आजही अनेक प्रश्‍न रेंगाळलेलेच आहेत. 

कोलग्राउट पद्धतीने बांधकाम झालेले महाराष्ट्रातील हे पहिलेच धरण. मात्र, दुर्दैवाने धरणाला सुरवातीपासून गळतीचे ग्रहण लागले ते आजपर्यंत सुरूच आहे. त्याच्या गळतीच्या व निकृष्ट कामाच्या जोरदार चर्चा मागील काळात उभ्या महाराष्ट्रात झडल्या. यातून खडबडून जागे होत अधिकाऱ्यांनी गळती दुरुस्तीचे काम हाती घेतले. दरवर्षी धरणाचे पाणी कमी करत ग्राउंटिंगचे काम अधिकाऱ्यांनी हाती घेतले. गेल्या काही वर्षात हे काम अव्याहतपणे सुरूच आहे. 

परिणामी गळतीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. ग्राउटिंगसाठी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जलाशयाची पाणीपातळी इतकी खालावली आहे की, आज धरणात केवळ पाऊण टीएमसी म्हणजे फक्त पंधरा टक्‍के पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे पाण्याच्या उदरात गायब झालेल्या गावांचे अवशेष वरती आले आहेत. यामध्ये घरांच्या भिंती, देवळाच्या भिंती, झाडे, विजेचे खांब, तोडलेली झाडे, घराशेजारील शेतांच्या बांधलेल्या ताली आदी खुणा दिसून येत आहेत.

आमचे लहानपण या ठिकाणी गेले. या निसर्गरम्य परिसरात आम्ही खेळलो, बागडलो. धरणाची घोषणा झाली अन्‌ आम्हाला हा परिसर व गाव सोडावे लागले. काळजावर दगड ठेवून आणि भरल्या डोळ्यांनी आम्ही गावे रिकामी केली. आता या ठिकाणी आल्यावर अवशेष पाहून पुन्हा जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
- संतोष जाधव प्रकल्पग्रस्त, सुंदरनगर

Web Title: tarali dam water rehabilitation