ताराराणी एक्‍स्प्रेस दिल्लीला रवाना

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 फेब्रुवारी 2019

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यकर्तृत्व नव्या पिढीसमोर यावे, त्यांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने खासदार संभाजीराजे दिल्लीत शिवजयंती उत्सव साजरा करतात. त्यांच्याच पुढाकाराने मोफत रेल्वेची सुविधा केली

कोल्हापूर - दोन वर्षांपासून खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने राजधानी नवी दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते. १९ फेब्रुवारीला होणाऱ्या शिवजयंतीसाठी यंदा जिल्ह्यातील शेकडो मावळ्यांचा ताफा आज ‘महाराणी ताराराणी एक्‍स्प्रेस’ या विशेष रेल्वेने दिल्लीला रवाना झाला. शाहिरी पोवाडे, डफाची थाप आणि छत्रपती शिवरायांचा जयघोष करीत छत्रपतींचा इतिहास जागविण्यासाठी मावळे रवाना झाले. यावेळी याज्ञसेनीराजे छत्रपती व संयोगीताराजे छत्रपती यांनी विशेष रेल्वेला झेंडा दाखविला.

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यकर्तृत्व नव्या पिढीसमोर यावे, त्यांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने खासदार संभाजीराजे दिल्लीत शिवजयंती उत्सव साजरा करतात. त्यांच्याच पुढाकाराने मोफत रेल्वेची सुविधा केली.येथील राजर्षी शाहू महाराज टर्मिनसवरून दुपारी दोन वाजता रेल्वे रवाना झाली.

प्रत्येक डब्याला गडकोटांची नावे
रेल्वेच्या प्रत्येक डब्यांना पन्हाळगड, विशाळगड, रायगड, रांगणा, वसंतगड अशी गडकोटांची नावे दिली आहेत.

शिवजयंती उत्सवात मावळे महाराष्ट्राच्या पारंपरिक कला सादर करणार आहेत. यात धनगरी ढोल, युद्धकला, मर्दानी खेळ, गोंधळी, शाहीर भजन, गजनृत्य, लोक संगीत आदी कला सादर करणारी पथके रेल्वेने रवाना झाली. यावेळी शाहीर आझाद नाईकवडी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा जयजयकार करणारे पोवाडे सादर केले.

फौंडेशनतर्फे जेवण
जयंती उत्सवात जेवण, चहा, नाष्टा, निवास अशा सर्व सुविधा छत्रपती संभाजीराजे फौंडेशनतर्फे करण्यात येणार आहे.
परराज्यातील कलावंत उत्सवात महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या कलावंतांबरोबर पुणे, सातारासह अन्य जिल्ह्यांतील कलावंत आहेत. तसेच दिल्लीतील सोहळ्यात अरुणाचल, नागालॅंड, मणिपूर आदी राज्यांचे कलावंत सहभागी होतील.

महापौर सरिता मोरे, मधुरिमाराजे छत्रपती, वसुंधरा पवार, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, प्रतिमा सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tararani Express special train for Shiv Jayanti in Delhi