सुमनताईंच्या विरोधात शिवसेनेतून कोण?

सुमनताईंच्या विरोधात शिवसेनेतून कोण?

तासगाव - लोकसभा आणि विधानसभेसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाल्याने तासगाव तालुक्‍याचा अंतर्भाग असलेले तासगाव-कवठेमहांकाळ आणि खानापूर-आटपाडी हे दोन्ही विधानसभा  मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्याने सेना कार्यकर्त्यांमध्ये खुशी, तर भाजपची गोची आणि राष्ट्रवादीत आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. आता तासगाव- कवठेमहांकाळमधून आमदार सुमनताई पाटील यांच्या विरोधात शिवसेनेतून कोण, याची चर्चा सुरू झाली आहे. 

राष्ट्रवादीची तासगाव-कवठेमहांकाळमधील तिसरी विधानसभा निवडणूक असणार आहे. संजयकाका पाटील अथवा त्यांच्या गटाकडून मतदारसंघ पुनर्रचना  झाल्यानंतर विधानसभा लढविलेली नाही. त्यातच काका निवडणुकीत थेट नसल्याने ही युती राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडणार अशी चर्चा आहे. युतीमध्ये तासगाव- कवठेमहांकाळ सेनेकडे येणार असल्याने शिवसेनेत फिलगुड असले तरी सेनेची तालुक्‍यात ताकद किती? हा प्रश्न निरुत्तर करणारा आहे. सत्तेत असून निराधार अशी सेनेची तालुक्‍यात अवस्था आहे. आधीच तोळामासा असलेल्या सेना कार्यकर्त्यांना ताकद मिळण्याची गरज होती, मात्र भाजपच्या मोठ्या झाडाखाली शिवसेनेचे झाड वाढूच दिले नाही. सत्ता असूनही एखादेही शासकीय पद नाही अशी अवस्था आहे.

तालुक्‍याचा भाग असलेल्या खानापूर-आटपाडीतून आमदार अनिल बाबर असतील पण तासगाव-कवठेमहांकाळमधून कोण? भाजप दोन्ही मतदारसंघात सेनेच्या पाठीशी रहाणार काय? या प्रश्‍नांची उत्तरे सेनेचे कार्यकर्ते शोधत आहेत. २०१४ च्या निवडणुकीतील सेनेचे उमेदवार महेश खराडे परत स्वगृही गेले आहेत. २००९च्या निवडणुकीतील दिनकर पाटील यांच्याबद्दल अनिश्‍चितता आहे. त्यामुळे गेल्या वेळीप्रमाणे ऐनवेळी धक्कादायक उमेदवार पुढे येण्याची शक्‍यता आहे.

भाजपची गोची
भाजपा-सेनेच्या युतीमुळे तालुक्‍यातील भाजपा तथा खासदार गटाची गोची होणार आहे. मुळात स्वतः संजयकाका पाटील उमेदवार असणार नाहीत. आणि दुसरा पर्याय नसल्याने काका गटाला सेनेच्या मागे फरफटत  जावे लागेल. शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते गेल्या  पाच वर्षांत कधीही एखाद्या कार्यक्रमालाही एकत्र आलेले नाहीत, असे असले तरी काका गटाच्या भूमिकेवरच युतीच्या उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे हे ही  तितकेच खरे आहे. असाच प्रकार खानापूर आटपाडी मतदार संघात ही आहे, याभागातील खासदार गटाचे  आणि अनिल बाबर यांचे कधी जुळलेच नाही. त्याभागातील आबा गट अनिल भाऊंच्या अधिक जवळचा असे चित्र असल्याने युती झाल्याने सारी गोची झाली आहे.

विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत 
शिवसेनेला मिळालेली मते
  १९९९ - संजय पाटील    ४११९
  २००४ - डॉ. प्रताप पाटील    २२११
  २००९ - दिनकर पाटील    ३३९३६
  २०१४ - महेश खराडे    १९६७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com