तासगाव नगरपालिका वार्तापत्र : शेवटच्या टप्प्यात 'मिले सूर मेरा तुम्हारा'

रवींद्र माने
Saturday, 6 February 2021

तासगाव नगरपालिकेसाठी खासदारांच्या बैठका झाल्या... पदाधिकारी बदलले... मॅरेथॉन आढावा बैठका झाल्या पण पदाधिकाऱ्यांचे " मिले सूर मेरा तुम्हारा' होणार का?

तासगाव (जि. सांगली) : तासगाव नगरपालिकेसाठी खासदारांच्या बैठका झाल्या... पदाधिकारी बदलले... मॅरेथॉन आढावा बैठका झाल्या पण पदाधिकाऱ्यांचे " मिले सूर मेरा तुम्हारा' होणार का? शेवटच्या टप्पात तरी नगराध्यक्षांना सत्ताधारी मिसळून घेणार का? यावर खासदारांनी कसा तोडगा काढला आहे? असा प्रश्न चर्चेत आला आहे. 

अवघ्या आठ दहा महिन्यावर पालिकेची निवडणूक आली आहे. सगल्याच पक्षांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. पालिकेतील सत्ताधारीही त्यामध्ये मागे नाहीत. गेल्या चार वर्षांत राहिलेला विकास कामांचा बॅकलॉग पुढच्या आठ दहा महिन्यात भरून काढण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

त्यासाठी चार वर्षांत न झालेले पदाधिकारी बदल करण्यात आले. पुढील काळात आणखी काही जणांना उपनगराध्यक्ष करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील सगळे रस्ते डांबरीकरण, रखडलेले हॉस्पिटल, शाळेचे काम पूर्ण करणे, शिवाय अनेक कामांच्या निविदा निघाल्या आहेत. चार वर्षांत केलेल्या चुका झालेला भ्रष्टाचार तासगावकरांच्या लक्षात येताच कामा नये अशी एकूण फुल्ल प्रूफ जय्यत तयारी करण्यात आली आहे. 

पण सत्ताधारी भाजप मधील गटबाजीचे काय ? ही गटबाजी संपलेली नाही. नवे पदाधिकारी नेमले पण अजूनही काही जणांची नाराजी लपून राहिलेली नाही. यापूर्वी जसे नगरसेवक पालिकेत यायचे बंद झाले होते. ती परिस्थिती आजही कायम आहे. पक्षप्रतोद म्हणून जाफर मुजावर यांच्या निवडीला झालेला विरोध मोडून खासदारांनी निर्णय घेतला असला तरी ही नाराजी दूर करून नाराजांना कामाला लावण्याचे काम खासदारांना करावे लागणार आहे.

सुरू असलेल्या कामाच्या धडाक्‍याला प्रशासनाला जुळवून घेणे अशक्‍य असल्याचे आठवड्यातच उघड झाले आहे. "शिल्लक वेळ शिल्लक निधी", यांचा मेळ घालावा लागणार आहे. तशी मानसिकता तयार करण्याचे मोठे आव्हान सत्ताधारी भाजप समोर उभे राहिले आहे. 

सत्ताधारी भाजप समोर आव्हान
भाजपचे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून डॉ विजय सावंत निवडून आले खरे ! पण त्यांचे आणि सत्ताधारी नगरसेवकांचे कधीच पटले नाही. नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांचे सूर जुळलेच नाहीत. विरोधकांच्या ऐवजी सत्ताधार्यांनीच त्यांना वारंवार अडचणीत आणले ही वस्तुस्थिती आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे पटले नाही, नगरसेवकांमध्ये दोन गट आता शिल्लक आठ दहा महिन्यात हे सूर जुळवण्याचे आव्हान सत्ताधारी भाजप समोर आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tasgaon Municipal Newsletter: In the last phase, 'Mile Sur Mera Tumhara'