तासगाव पालिका वार्तापत्र : नगरसेवकांच्या "अभ्यासाची' खुमासदार चर्चा

रवींद्र माने
Tuesday, 2 March 2021

तासगाव पालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर गेल्या चार वर्षांत खासदार संजयकाकांच्या कारभाऱ्यांनी केलेल्या कामावर "कळस' चढविण्याचे काम नुकत्याच झालेल्या पालिकेच्या अर्थसंकल्पाच्या सभेत सत्ताधारी गटानेच केले.

तासगाव (जि. सांगली) : तासगाव पालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर गेल्या चार वर्षांत खासदार संजयकाकांच्या कारभाऱ्यांनी केलेल्या कामावर "कळस' चढविण्याचे काम नुकत्याच झालेल्या पालिकेच्या अर्थसंकल्पाच्या सभेत सत्ताधारी गटानेच केले. ही सभाच तहकूब करण्याची मागणी करून अकलेचे दिवाळे वाजले असल्याचे दाखवून दिले. या नगरसेवकांच्या "अभ्यासाची' खुमासदार चर्चा सध्या गावात सुरू आहे. 

तासगाव पालिकेतील भाजपच्या कारभाराचा डंका गेली चार वर्षे वेगवेगळ्या कारणांनी कारभारी वाजवत आहेतच, पण पालिकेच्या अंदाजपत्रकाच्या वेळेवर प्रती न मिळाल्याने "अभ्यास झालेला नाही' असे म्हणत प्रशासनावर ठपका ठेवत सत्ताधाऱ्यांनी सभाच तहकूब ठेवा ! म्हणत पक्षाची अब्रू घालवलीच, पण त्यानंतर नाईलाजाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ केली नाही म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात कमीपणा मानला नाही. एकूणच आपण काय करतोय ? याचे भान आता शेवटच्या टप्प्यात ही आलेले नाही हेच कारभाऱ्यानी दाखवून दिले.

दुर्दैवाने हे भान गेली चार वर्षेही राहिलेच नव्हते. किमान आता उरलेले आठ-दहा महिने तरी नीट काम होईल अशी नागरिकांची अपेक्षा होती ती ही फोल ठरली आहे. वास्तविक वर्षाचे पालिकेचे बजेट हे केलेल्या आणि झालेल्या कामाचा आढावा असतो. काय केले किती राहिले ? याचा लेखाजोखा मांडण्याची संधी असते.

मात्र, विद्यमान कारभाऱ्यापैकी अनेक जण आता पुन्हा पालिकेत निवडून येण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे त्यांना या कशाशी देणे-घेणे नाही. आणि जे येण्यासाठी परत तयारी करत आहेत, त्यांनी गंमती सुरू केल्या आहेत. त्यांना पक्ष-नेते यांच्याशी काही देणे-घेणे नाही, कदाचित हे लक्षात आल्यानेच त्यांचे नेते स्वतः मैदानात उतरले आहेत. 

आर्थिक स्थिती नाजूक 
गंमत म्हणजे पालिकेच्या अर्थसंकल्पाचा अभ्यास झाला नाही हे कारण पुढे करण्यात आले. या "अभ्यासू'नगरसेवकांच्या अभ्यासाची चर्चा सुरू झाली आहे. कापूर ओढ्यात 75 लाख रुपये खर्च करण्यापूर्वी झालेला अभ्यास ! 5 कोटींची पालिकेच्या नव्या इमारतीचे 10 कोटी पर्यंत वाढलेल्या इस्टीमेटचा अभ्यास ! 24 तास मीटरने पाणी देण्यासाठी झालेल्या खर्चाचा अभ्यास ! स्वच्छता ठेक्‍याच्या दोन वेळा केलेला अभ्यास ! पालिकेची आर्थिक स्थिती सध्या खूप नाजूक आहे. वर्षानुवर्षे जपलेला पालिकेचा स्वनिधी ही संपला आहे. इतका की गाळ्याचे डिपॉझिट परत देण्यासाठी पालिकेकडे पैसे नाहीत इतका मोठा अभ्यास गेल्या चार वर्षांत कारभाऱ्यांनी केला आहे. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tasgaon Municipality Newsletter: A lively discussion of the 'study' of the corporators