महाविद्यालयीन तरुणीची तासगावात आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

तासगाव - येथील शासकीय महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्रणाली प्रकाश पाटील (वय १७, रा. साखराळे, ता. वाळवा) या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. या प्रकाराने महाविद्यालयात खळबळ उडाली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

तासगाव - येथील शासकीय महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्रणाली प्रकाश पाटील (वय १७, रा. साखराळे, ता. वाळवा) या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. या प्रकाराने महाविद्यालयात खळबळ उडाली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रणाली पाटील ही तासगाव येथील शासकीय महिला तंत्रनिकेतनमध्ये ड्रेस डिझायनर शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयात वसतिगृहाची सोय आहे. या वसतिगृहामध्ये अन्य तीन विद्यार्थिनींसह प्रणाली रहात होती. तिच्या समवेत राहणाऱ्या विद्यार्थिनी शनिवार, रविवार सुटी असल्याने आपल्या गावी गेल्या होत्या. वसतिगृहाच्या खोलीमध्ये प्रणाली काल एकटीच होती. रात्री झोपल्यानंतर सकाळी अकरा वाजेपर्यंत खोलीचा दरवाजा न उघडल्याने बाजूच्या मुलींनी ही बाब वसतिगृह अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिली.

त्यानंतर प्रणालीच्या खोलीत खिडकीतून पाहिले असता तिने ओढणीने गळफास लावून घेतल्याचे उघडकीस आले. तातडीने हा प्रकार पोलिसांना कळविण्यात आला. दरम्यान तिने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये आपल्या आत्महत्येस कोणासही जबाबदार  धरू नये,  असे म्हटल्याचे पोलिसांतून सांगण्यात आले.  आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

प्रणाली पाटीलही गावी जाणार होती. मात्र तिचे जाणे रद्द झाले. काल रात्री तिने पालकांशी दूरध्वनीवरून बोलणेही केले होते. त्यानंतर रात्री तिने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकारानंतर आज दिवसभर वसतिगृहामध्ये विद्यार्थिनी बाहेर पडल्या नव्हत्या. महाविद्यालयाच्या प्रशासनाशी संपर्क साधला असता काही माहिती मिळू शकली नाही. याप्रकरणी आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रियांका सराटे करत आहेत.

Web Title: tasgaon news college girl student suicide