तीस विषयांसाठीची सभा दहा मिनिटांत गुंडाळली 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

तासगाव - नोकरभरती, पंतप्रधान घरकूल योजनेचा प्रकल्प अहवाल यासारख्या महत्त्वाच्या तब्बल 30 विषयांसाठी बोलविलेली तासगाव पालिकेची सभा विषयवाचन, कोणतीही चर्चा न होता, सभा संपल्याचे जाहीर ही न होता अक्षरशः दहा मिनिटांत गुंडाळली गेली. सभा संपल्याचे कुणालाच कळले नाही. 

तासगाव - नोकरभरती, पंतप्रधान घरकूल योजनेचा प्रकल्प अहवाल यासारख्या महत्त्वाच्या तब्बल 30 विषयांसाठी बोलविलेली तासगाव पालिकेची सभा विषयवाचन, कोणतीही चर्चा न होता, सभा संपल्याचे जाहीर ही न होता अक्षरशः दहा मिनिटांत गुंडाळली गेली. सभा संपल्याचे कुणालाच कळले नाही. 

पालिकेवर भाजपचा झेंडा फडकल्यानंतर अवघ्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये विषयांचे वाचन, ठरावांवर चर्चा झाली. त्यानंतर सभा गुंडाळण्याचे सत्र जे सुरू आहे ते आजही कायम होते. पालिका सभागृहात आज सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत हे होते. उपनगराध्यक्षा दीपाली पाटील, मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका सभेसाठी उपस्थित होते. 

प्रारंभी नगराध्यक्षांनी सर्वांनी विषयपत्रिका वाचली आहे काय, अशी विचारणा केली. त्यामुळे विषयांचे वाचन होण्याचा प्रश्‍न निकालात निघाला. त्यातूनही राष्ट्रवादीचे नगरसेवक अभिजित माळी, बाळासाहेब सावंत बोलण्यास उठले, त्यावर नगराध्यक्ष सावंत यांनी विषयपत्रिकेत जे विषय आहेत ते विषय सोडून अन्य कोणत्याही विषयावर बोलू नका, असे सुनावले. दरम्यान, नगरसेवक अनिल कुत्ते यांनी सर्व विषय मताला टाकावेत, अशी मागणी केली. त्यातूनही अभिजित माळी पाण्याच्या नळाला बसविण्यात येत असलेले मीटर सदोष असल्याची तक्रार केली, त्यावर नगराध्यक्षांनी अद्याप कोणाची तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यास ठेकेदाराकडून बदलून दिले जाईल, असा खुलासा नगरसेवक ऍड. सचिन गुजर यांनी केला. त्याचवेळी पालिकेचे बॅंक खाते रत्नाकर बॅंक आणि येस बॅंकेत काढण्याच्या विषयावर अभिजित माळी बोलण्याचा प्रयत्न करत असतानाच सत्ताधारी बाकावरील एकेक नगरसेवकांनी हात वर करण्यास सुरवात केली आणि अचानक सभा संपली. त्यावर विरोधक नगराध्यक्षांना उद्देशून किमान सभा संपल्याचे तरी जाहीर करा, असे म्हणत असताना सत्ताधारी नगरसेवकांनी सभागृह सोडले. 

या विषययांवर चर्चा होणे गरजेचे होते 
वास्तविक सध्या पालिकेत भाजपचे पूर्ण बहुमत आहे, तसा विरोधकांचा आवाजही क्षीणच आहे. असे असताना चर्चा करून विरोधकांना नामोहरम करणे सत्ताधाऱ्यांना सहज शक्‍य आहे. या पार्श्‍वभूमीवर सभा गुंडाळण्याच्या धोरणाबाबत आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. आज सभेपुढे नोकरभरती, दलितवस्ती सुधार योजनेतून विकास कामे, वृक्षसंवर्धन समिती स्थापन करणे, क्रीडासंकुलातील जलतरण तलाव चालविण्यास देणे, घरकूल योजनेचा प्रकल्प अहवाल करणे, वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून कामे प्रस्तावित करणे, वैद्यकीय कक्ष स्थापन करणे, यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणे अपेक्षित होते. 

Web Title: tasgaon news municipal meeting