कुमठ्यात दारूची बाटली आडवी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

तासगाव - कुमठे (ता. तासगाव) येथे महिलांनी दारूबंदीच्या विरोधात वर्षापासून सुरू केलेल्या लोक आंदोलनाला आज यश आले. गावातील 1810 पैकी 1610 महिलांनी "आडव्या बाटली' ला मतदान करून गावातील देशी दारूचे दुकान बंद केले. या ऐतिहासिक विजयानंतर महिलांनी एकच जल्लोष केला. 

तासगाव - कुमठे (ता. तासगाव) येथे महिलांनी दारूबंदीच्या विरोधात वर्षापासून सुरू केलेल्या लोक आंदोलनाला आज यश आले. गावातील 1810 पैकी 1610 महिलांनी "आडव्या बाटली' ला मतदान करून गावातील देशी दारूचे दुकान बंद केले. या ऐतिहासिक विजयानंतर महिलांनी एकच जल्लोष केला. 

कुमठे येथील देशी दारूचे दुकान बंद व्हावे, यासाठी गेले वर्षभर दारूबंदी कृती समितीच्या माध्यमातून महिलांनी आंदोलन सुरू केले होते. गावातील महिलांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा या आंदोलनाला मिळाला होता. संबंधित दारू दुकानदाराने न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला होता. गेले वर्षभर प्रबोधन सुरू होते. ग्रामपंचायत, ग्रामसभेचे ठराव करण्यात आले. शेवटी राज्य उत्पादन शुल्क विभागाला या आंदोलनाची दाद घ्यावी लागली. जिल्हाधिकाऱ्यांनी दारू दुकानाबाबत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर यावर काय निकाल लागणार याबाबत प्रचंड उत्सुकता लागली होती. 

कुमठे येथील प्राथमिक शाळेत तहसीलदार सुधाकर भोसले यांच्या उपस्थितीत पाच मतदान केंद्रांमध्ये सकाळी आठपासून मतदानाला सुरवात झाली. सकाळपासून महिलांची गर्दी होती. मतपत्रिकेवर उभी बाटली आणि आडव्या बाटलीचे चित्र होते. त्यावर महिलांनी मतदान करावयाचे होते. दुपारी बारापर्यंत एकूण 2478 पैकी 600 महिलांनी मतदान झाले होते. मतदान पाच वाजता संपले. त्यावेळी 1810 मतदान झाले होते. त्यानंतर सहा वाजता तहसीलदार भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी झाली. त्यामध्ये मतदान क्रेंद्र क्रमांक एकवर 355 मतदान झाले. त्यापैकी आडव्या बाटलीसाठी 332 तर उभ्या बाटलीला 23, मतदान केंद्र क्रमांक 2 वर 332 मतदानापैकी आडव्या बाटलीला 316 तर उभ्या बाटलीसाठी 16, केंद्र क्रमांक 3 वर 407 पैकी आडव्या बाटलीला 372 तर उभ्या बाटलीला 35, केंद्र क्रमांक 4 वर झालेल्या 307 पैकी 282 आडव्या बाटलीला तर 25 मतदान उभ्या बाटलीला झाले. क्रमांक पाचवर 391 पैकी आडव्या बाटलीला 378 तर उभ्या बाटलीला 13 मतदान झाले. आडव्या बाटलीच्या बाजूने एकूण 1680 तर उभ्या बाटलीसाठी 112 मते पडली. 30 मते अवैध ठरली. 

निकाल जाहीर होताच महिलांनी एकच जल्लोष केला. तहसीलदार भोसले यांनी मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडल्याबद्दल ग्रामस्थ आणि मतदार महिलांचे आभार मानले. 

तालुक्‍यातील महिलांनी आदर्श घ्यावा 
गेल्यावर्षी 27 ऑगस्ट रोजी कुमठ्यातील देशी दारूचे दुकान बंद करावे, यासाठी महिला एकत्र येण्यास सुरवात झाली. सुरवातीला प्रचंड विरोध आणि त्यानंतर सर्व राजकीय कार्यकर्त्यांचाही पाठिंबा या आंदोलनाला मिळत गेला. मतदान घेण्यासाठीही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे खूप प्रयत्न करावे लागले. शेवटी महिलांच्या एकजुटीला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. हा आदर्श तालुक्‍यातील प्रत्येक गावातील महिलांनी घ्यावा, अशा प्रतिक्रिया व्यक्‍त होत होत्या.

Web Title: tasgaon news wine