खासदार झाल्यानं अक्कल येत नाही - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

तासगाव - माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या तासगावात पोलिसांवर हल्ला होणे, ही महाराष्ट्रासाठी शोकांतिका आहे. खासदार झालं म्हणून  फार अक्‍कल येतेच असे नाही. चुकीची माणसं मोठ्या पदांवर गेली की काय होतं, याचा अनुभव इथली जनता घेत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज खासदार संजय पाटील यांचे नाव न घेता हल्लाबोल केला. 

तासगाव - माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या तासगावात पोलिसांवर हल्ला होणे, ही महाराष्ट्रासाठी शोकांतिका आहे. खासदार झालं म्हणून  फार अक्‍कल येतेच असे नाही. चुकीची माणसं मोठ्या पदांवर गेली की काय होतं, याचा अनुभव इथली जनता घेत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज खासदार संजय पाटील यांचे नाव न घेता हल्लाबोल केला. 

खासदार पाटील यांच्या घरच्या मैदानात श्री. पवार यांनी चौफेर फटकेबाजी करत भाजपवरही हल्ला चढवला. काल जिल्ह्यातील तीन मोठ्या कार्यक्रमांत त्यांनी तासगाव प्रकरणावर फार बोलणे टाळले होते. आज तासगावमध्ये जाऊन त्यांनी खासदारांवर शेलक्‍या शब्दांत आसूड ओढले.

तासगाव नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीच्या वादातून भाजप-राष्ट्रवादीत धुमश्‍चक्री झाली होती. भाजप कार्यकर्त्यांनी थेट पोलिसांना मारहाण केली असा संदर्भ देत श्री. पवार यांनी खासदारांवर जोरदार टीका केली. पद कितीही मोठे मिळाले तरी पाय जमिनीवर राहिले पाहिजे. त्याचा उपयोग सामान्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी झाला पाहिजे. त्या सत्तेची मस्ती येता कामा नये, असा टोलाही त्यांनी लगावला. 

भाजपसोबत संघर्ष ताजा असताना राष्ट्रवादीने हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.  यानिमित्ताने कवठेएकंदपासून फेरी निघाली. त्यात हजारो लोकांनी सहभाग घेतला. बाजार समितीच्या आवारात  सभा झाली. श्री. पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील यांनी भाजपवर तोफा डागल्या. अण्णा डांगे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार सुमनताई पाटील, महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवक राष्ट्रवादीचे संग्राम कोलते-पाटील प्रमुख उपस्थित होते. 

श्री. पवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. ते म्हणाले,‘‘चार वर्षांत देशात ३६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. लोकसभेत कृषी  मंत्र्यांनीच ही माहिती दिली. गेल्या दोन वर्षांत २ लाख ४१ हजार कोटींची उद्योगपतींची कर्जे बॅंकांनी बुडीत  खाती जमा केली. मूठभर लोकांचा फायदा मोदी सरकार करून देतंय; मात्र शेतकऱ्यांसाठी पैसा नाही. सव्वालाख कोटी बुलेट ट्रेनसाठी आहेत, मात्र सांगली जिल्ह्यातील पाणी योजनांसाठी पैसे नाहीत. राज्यातील सरकार तर  फेकू आणि गाजर दाखवणारे आहे.’’

श्री. मुंढे म्हणाले,‘‘फडणवीसांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे; धनगर, मराठा, मुस्लिम समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवून फसवले. तिकडे बडे मियांनी कोट्यवधी तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून शेवटी पकोडे तळा, असे सांगितले. ४०० रुपये सिलिंडर आणि ५० रुपये पेट्रोल होते; तेव्हा महागाई होती. सध्या भाजपने इंजेक्‍शन दिले तरी सुई टोचत नाही, अशी अवस्था आहे. तासगावातच काय राज्यात कायद्याचे  राज्य आहे की नाही, असा प्रश्‍न पडतो. पोलिसच सुरक्षित नसतील तर कुणी कुणाचे संरक्षण करायचे. कुछ ही दिन बचे है, जरा मर्यादा ठेवा.’’

जयंत पाटील म्हणाले,‘‘जिल्ह्यातील पाणी योजनांची  स्थिती निवडणुका आल्या की सुरू, संपल्या की बंद, अशी आहे. तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यात आबांनी पाणी योजना आणून कार्यान्वित केल्या. त्या चालवणे ह्यांना जमेना झाले. आमदार सुमनताईंनी विधानसभेत  लक्ष वेधले, पण सरकार काही करेल असे वाटत नाही.’’ यावेळी माजी मंत्री वळसे-पाटील यांचे भाषण झाले. 

आमदार पाटील म्हणाल्या,‘‘शासनाकडून पदोपदी सामान्यांची अडवणूक केली जात आहे. पाणी योजना बंद असल्याने शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्‍न निर्माण  झाला आहे.’’

सावर्डेच्या दिलीप पाटील आणि ॲड. स्वप्नील पाटील यांनी भाजपातून आज पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला. मोठ्या आशेने तिकडे गेलो, मात्र त्यांची संगत नको,  असे मत मांडले. शंकरदादा पाटील यांनी प्रास्ताविक  केले. डॉ. वि. स. महाजन यांचे भाषण झाले. हणमंतराव देसाई यांनी आभार मानले. 

भाजपवर चौफेर हल्लाबोल
राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी तासगाव भाजप व खासदार संजय पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. धनंजय मुंढे यांनी ‘‘गेल्या तीन-चार दिवसांत तासगावकरांना अच्छे दिन महसूस होत असतील, इथल्या खासदारांनी  पोलिसांना मारून गृहमंत्र्यांवर हल्लाबोल केलाय’’, असा टोला हाणला. जयंत पाटील यांनी ‘‘आम्ही वैचारिक हल्लाबोल यात्रा काढली, त्याआधीच भाजप नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांवर हल्लाबोल करून  वैचारिक पातळी दाखवून दिली’’, असा टोला मारला.

Web Title: tasgaon sangli news ajit pawar hallabol rally speech politics