खासदारांच्या मनसुब्यांची लिटमस टेस्ट 

खासदारांच्या मनसुब्यांची लिटमस टेस्ट 

तासगाव तालुक्‍यातील 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समिती निवडणुकीचे रणांगण हातघाईवर आले आहे. "आपले-परके' असा भेद न करता एकमेकावर सारे तुटून पडत आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या पश्‍चात होणाऱ्या या पहिल्याच स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीची बेसलाइन परीक्षा होणार आहे. ही निवडणूक खासदार संजय पाटील यांनी तालुक्‍याच्या राजकारणात ठरवलेल्या मनसुब्यांचीही ही लिटमस टेस्ट असून त्यासाठी त्यांनी आबांच्या पट्ट शिलेदारांना आपल्या गोटात घेण्यासाठी जंगजंग पछाडले आहे. त्यात त्यांना यशही आले आहे. आता मतदार त्यांच्या पारड्यात किती यश टाकतात, याचाही फैसला होईल. 

खासदार संजय पाटील विरुद्ध आर. आर. पाटील अशी काटा लढत जिल्ह्याने सतत अनुभवली आहे. आबांच्या पश्‍चात मात्र संदर्भ बदलले तरी लढतीचा नूर तोच आहे. आर. आर. यांचा गट रिकामाच करायचा, यादृष्टीने खासदार पाटील यांनी गेल्या दोन वर्षात तालुक्‍यात केलेल्या मशागतीचे फळ म्हणून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या मुहूर्तांवर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये पक्षांतराचे पीक जोमाने फोफावले आहे. डी. के. काका पाटील, सुनील पाटील, सुभाष पाटील, साहेबराव पाटील असे राष्ट्रवादीचे खंदे एकापाठोपाठ एक भाजपाच्या गळाला लागले असून खासदारांनी राष्ट्रवादीला पुरते घायाळ केले आहे. एक वेळ तर अशी आली, की आता पक्षात कोण उरतो की नाही. 
दिनकर आबा पाटील गटाचे तालुक्‍यावरचे वर्चस्व संपवण्यासाठी आर.आर. पाटील यांना प्रदीर्घ काळ कसाने राजकारण करावे लागले. तालुक्‍यातील गावागावांत त्यांनी स्वतःचे कार्यकर्ते उभे केले. त्यांच्या अकाली निधनाने आणि राज्यातील बदललेल्या सत्ताकारणामुळे तालुक्‍यातील आबांच्या गटाला खिंडार पाडण्यात संजय पाटील यांना सहज यश मिळाले. आबांनी राजकारणात जसे यश मिळवले तसेच खासदारांनीही लोकसंपर्काच्या बळावर स्वतःचे तालुक्‍यात आणि जिल्ह्यात स्थान निर्माण केले. मात्र तासगावचा गड ताब्यात घेण्यात मात्र त्यांना यश मिळाले नाही. आता मात्र ही संधी साधायचीच, या इराद्याने खासदारांनी सांगली आणि तासगावमध्ये स्वतःचा गट डागडुजी करताना तो अधिक रसद भरून तयार केला आहे. अर्थात कवठेमहांकाळमध्येही त्यांनी स्वतःचा गट निर्माण केला असून माजी मंत्री अजितराव घोरपडे "येतील त्यांना सोबत घेऊन, अन्यथा त्यांच्याविना' अशी त्यांची तयारी आहे. 
खासदारांचे तालुक्‍यावर एकमुखी वर्चस्वाचे प्रयत्न सुरू असताना त्यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील यांचे आव्हान असेल. त्यांनी नुकत्याच झालेली तासगाव नगरपालिकेची एकतर्फी निवडणूक चुरशीची करण्यात यश मिळवले होते. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाचा अश्‍वमेध वेगाने घोडदौड करीत असतानाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे धैर्य उंचावले आहे. फूट-नाराजीचे ग्रहणावर मात करीत त्यांनी बंडोबांना थंड करण्यात बऱ्यापैकी यश मिळवले आहे. 
भाजपाला सहा पंचायत समिती आणि दोन जिल्हा परिषद गटामध्ये एबी फॉर्म देण्यात झालेल्या (की केलेल्या?) गोंधळामुळे भाजप पुरस्कृत उमेदवार व्हावे लागले. राष्ट्रवादीबरोबर पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीची झुंज लावण्यात खासदारांना यश मिळाले आहे. त्यासाठी त्यांनी घरातूनच तंटामुक्ती करण्यासाठी ठोस प्रयत्न केले. डीके काकांच्या भाजप प्रवेशामुळे ते यशस्वीही झाले. खासदारांनी टाकलेल्या जाळ्यात दररोज नवनवे राष्ट्रवादीचे मोहरे अडकत आहेत. आजचा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता उद्या त्याच पक्षात असेल तर याची खात्री खुद्द तो कार्यकर्ताही देऊ शकत नाही. 
सध्या राष्ट्रवादीचे बालेकिल्ले असलेले सावळज, विसापूर, मांजर्डे हे तीन गट हॉटसीट बनले असून, यशापयशाचा लंबक सतत इकडेतिकडे हलताना दिसत आहे. विसापूरमध्ये सुनील पाटील यांचा पक्षप्रवेश, मांजर्डे गटातील राष्ट्रवादीची अनागोंदी आणि सावळजमधे फुटीरतेचे आणि नाराजीचे ग्रहणाचे परिणाम काय, हे लवकरच कळेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com