तासगाव पालिकेचा ६१ कोटी १३ लाखांचा अर्थसंकल्प

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

तासगाव - तासगाव नगरपालिकेचा ६१ कोटी १३ लाख २३ हजारांचा, २ लाख ६१ हजार ९३३ रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प कोणतीही चर्चा न करता एकमताने मंजूर करण्यात आला. कोणतेही ठोस काम नाही, धोरणात्मक निर्णय नाही, मात्र गेल्या वर्षीपेक्षा १४ कोटी अधिक खर्चाचा अर्थसंकल्प आज मांडण्यात आला. 

तासगाव - तासगाव नगरपालिकेचा ६१ कोटी १३ लाख २३ हजारांचा, २ लाख ६१ हजार ९३३ रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प कोणतीही चर्चा न करता एकमताने मंजूर करण्यात आला. कोणतेही ठोस काम नाही, धोरणात्मक निर्णय नाही, मात्र गेल्या वर्षीपेक्षा १४ कोटी अधिक खर्चाचा अर्थसंकल्प आज मांडण्यात आला. 

तासगाव पालिकेच्या आमदार आर. आर. पाटील सभागृहात आज विशेष अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेपुढे पालिकेचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत, उपनगराध्यक्षा दीपाली पाटील, मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. अर्थसंकल्पाचा जमा खर्चाचा गोषवारा वाचून दाखविल्यानंतर ६१ कोटी १३ लाख २३ हजार रुपये खर्चाचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. 

गेल्या वर्षी ४४ कोटींचा अर्थ संकल्प मांडण्यात आला होता, त्यापैकी मार्च अखेर ३८ कोटी २३ लाख रुपये खर्च होणार आहेत. यावर्षी अर्थसंकल्पात वाढ करून ६१ कोटी १३ लाखांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये असलेल्या छ. शिवाजी महाराज चबुतरा पुतळा, पालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत, नवीन शॉपिंग सेंटर बांधणे, मटण व मच्छी मार्केट बांधणे, वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधील कामे याबाबी सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पामध्ये कायम राहिलेल्या आहेत. नवीन कोणतेही धोरणात्मक निर्णय नाहीत,  शहराच्या विकासाला दिशा देणारी कामे नाहीत, कोणतीही करवाढ नाही, असा अर्थसंकल्प असे वर्णन या अर्थसंकल्पाचे करावे लागेल. 

पालिकेकडे पालिकेचे उत्पन्न, शासकीय अनुदान, कर्जे, यातून ४६ कोटी ५२ लाख ५२ हजार रुपये अपेक्षित उत्पन्न आणि मागील शिल्लक १४ कोटी ६३ लाख ३२ हजार ९३३ असे ६१ कोटी १५ लाख ८४ हजार ९३३ रुपये अपेक्षित जमा आहे. त्यातून कर्मचारी वेतन व भत्त्यासांठी ३ कोटी ६२ लाख ५ हजार, तर निवृत्तिवेतनासाठी २ कोटी खर्च होणार आहेत. प्राथमिक शाळा दुरुस्ती वीज बिलसाठी २३ लाख आणि शिक्षण मंडळ वर्गणी १० लाख, छ. शिवाजी महाराज पुतळा चबुतरा बांधणे व अन्य पुतळे बांधणे व देखभाल यासाठी ४७ लाख, पालिका प्रशासकीय इमारत बांधणे ४ कोटी, १४ व्या वित्त आयोग निधीतून ३ कोटी, पाणीपुरवठा मीटर बसविणे २५ लाख, वैशिष्ट्यपूर्ण योजना निधी २ कोटी, उर्वरित वैधानिक विकास महामंडळ अनुदानातून होणाऱ्या कामांवर २५ लाख, दलित वस्ती सुधार योजनेतून मिळणाऱ्या निधीतून २ कोटी ७० लाखांची कामे, यासह सार्वजनिक कामांवर ३१ कोटी ३५ लाख ५० हजार रुपये अंदाजे खर्च होणार आहे. तर मटण मार्केट, नवीन शॉपिंग सेंटर, प्राथमिक शाळा इमारती बांधणे, नवीन बागा तयार करणे, यासाठी ९५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

Web Title: tasgav municipal budget