कर आकारणीवरून महाबळेश्‍वर गरम

कर आकारणीवरून महाबळेश्‍वर गरम

महाबळेश्वर - नगरपालिकेने येथील हॉटेलांमध्ये मिळणाऱ्या सेवासुविधांच्या आधारे त्यांचा दर्जा ठरवून प्रत्येक दर्जासाठी वेगवेगळी मिळकत कर आकारणी करण्याचा निर्णय घेऊन कर वसुलीच्या नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, हॉटेल व्यावसायिकांनी या नवीन कर आकारणीस हरकत घेतली असून, पालिकेने त्याचा विचार केला नाही तर न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. 

पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी पालिकेचे जे कोणी कारभारी आहेत, त्यांनी हॉटेलचा दर्जा ठरविण्याचा जो काही जावईशोध लावलेला आहे, त्यामुळे पालिकेचे उत्पन्न तिप्पट वाढेल. मात्र, अन्यायकारक कर वाढीने हॉटेल व्यावसायिकांचे कंबरडे मोडेल. कारण या दर्जानुसार कर आकारणीमुळे कोणाला दुप्पट तर कोणाला पाचपट कर भरण्याची नोटीस आलेली आहे. लाखो रुपये कराच्या नोटिसा पाहून येथील मिळकतधारकांचे डोळेच पांढरे झाले आहेत, तर इतर मिळकत करवाढीनेही शहरात पालिकेच्या कारभाराविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या कर आकाराणीस मोठा विरोध होत आहे. परंतु, या कर वाढीची कोणीच दखल घेतली नाही. 

आमदार मकरंद पाटील यांनी कर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु, त्यांनाही म्हणावे असे यश आलेले नाही. या बाबत हरकती मागविण्यात आल्या. या हरकतींची सुनावणी घेण्यात आली. परंतु, पहिल्या हरकतींची दखल न घेता सर्वांच्या हरकती फेटाळण्यात आल्या. शहरात सुमारे अडीच हजार मिळकतधारक आहेत. त्यापैकी सुमारे ९०० मिळकतधारकांनी पहिल्यांदा हरकत घेतली होती. या हरकती फेटाळण्यात आल्यामुळे पुन्हा त्यापैकी सुमारे ४०० मिळकतधारकांनी दुसरे अपील दाखल केले. या ४०० मिळकतधारकांमध्ये सर्वांत जास्त हॉटेल व लॉज व्यावसायिकांचा समावेश आहे. पुन्हा दुसरे अपील घेण्याची सूचना पालिकेने केली. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अपिलीय समितीने हरकतींची सुनावणी घेतली. मात्र, समितीनेही जुजबी कर कमी करून पुन्हा मिळकतधारकांना वसुलीच्या नोटिसा पाठविल्यामुळे शहरातील मिळकतधारकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

हॉटेलच्या क्षेत्रावर नव्हे, तर खोल्यांवर कर! 
चतुर्थ वार्षिक कर आकारणी करताना करात पालिकेने घरगुतीसाठी २५ टक्के तर वाणिज्य वापराच्या मिळकतीवर ४० टक्के कर वाढ केली. इतकेच नाही तर हॉटेलची अ, ब, क अशा तीन दर्जात विभागणी करून प्रत्येक दर्जासाठी वेगळा दर निश्‍चित केला आहे. तसेच हा दर बांधकाम क्षेत्रावर नाही तर, मिळकतीत किती खोल्या आहेत, त्या खोल्यांवर कर आकारणी करून  बिले वितरीत केली आहेत. 

राम मंदिरात आज बैठक
दरम्यान, मिळकतधारकांच्या हरकतींचा विचार होत नसल्याने न्यायालयात जाण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी येथील श्रीराम मंदिरात उद्या (ता.२१) सकाळी ११ वाजता मिळकतधारकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com