आटपाडीत करवसुलीचा धडाका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

आटपाडी - येथील ग्रामपंचायतीने कर वसुलीची मोहीम तीव्र करत नळ कनेक्‍शन तोडण्यास सुरवात केली. प्रशासनानेही जोर लावत गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घरोघरी जाऊन वसुली सुरू केली.

आटपाडी - येथील ग्रामपंचायतीने कर वसुलीची मोहीम तीव्र करत नळ कनेक्‍शन तोडण्यास सुरवात केली. प्रशासनानेही जोर लावत गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घरोघरी जाऊन वसुली सुरू केली.

ग्रामपंचायतीची घरपट्टी आणि पाणीपट्टीची थकबाकी मोठी आहे. मोजकीच मंडळी दरवर्षी कर भरतात. तर काही मंडळी चार, सहा ते आठ, दहा वर्षे थकबाकीदार आहेत. गावातील मातब्बरच कर भरत नाहीत. ग्रामपंचायत त्यांच्यावर कोणतीच कारवाई करत नाही. करवसुलीला गेलेल्या कर्मचाऱ्यांना दमबाजी करून माघारी पाठवले जाते. त्यामुळे ग्रामपंचायतीसमोर कर वसुलीचे मोठे आवाहन बनले आहे. लोकांकडून मोठा कर वसूल होत नसल्यामुळे पाणी योजनेच्या वीजबिलाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. 

पाणी योजनेच्या सर्व कनेक्‍शनची थकबाकी ९३ लाखांवर गेली आहे. मार्च अखेरमुळे वीज मंडळानेही थकबाकीची वसुली मोहीम सुरू केली. यातूनच वीज मंडळाच्या कार्यालयाने ग्रामपंचायतीला वीज कनेक्‍शन तोडण्याची नोटीस पाठवली. ग्रामपंचायतीकडे किमान दहा लाख रुपये भरण्याची मागणी केली; अन्यथा वीज कनेक्‍शन तोडले जाण्याची शक्‍यता आहे. ऐन उन्हाळ्यात लोकांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ येणार आहे. 

तालुकाभर ग्रामपंचायतीनी करवसुली जोरात सुरू केली. आटपाडी ग्रामपंचायतीनेही वाजंत्री लावून करवसुली सुरू केली. लोकांकडून दमबाजीचे प्रकार होऊ लागल्यामुळे आटपाडी पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली. लोणारखोरीत पिण्याचे पाणी पोहोचत नसल्यामुळे धांडोरमळ्यातील सात कनेक्‍शन तोडली. यातील काही कनेक्‍शन थकबाकीमुळे, काही बोगस असल्यामुळे कारवाई केली. 

आज गटविकास अधिकारी श्रीमती साळुंखे यांनी विस्तार अधिकारी श्री. शिंदे, ग्रामविस्तार अधिकारी उत्तम पाटील आणि कर्मचाऱ्यांना सोबत कर वसूल केला.

Web Title: tax recovery in aatpadi