शिक्षकाने केले 'हे' त्यामुळे झाले अपहरण!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

चोवीस तासांत सुटका; सोलापूर तालुका पोलिसांनी चौघांना इंडीमधून केली अटक 

सोलापूर : शेतीच्या व्यवहारातील पैशाच्या कारणावरून जिल्हा परिषद शिक्षक शांतप्पा हेगोंडे (वय 45, रा. सहयोगनगर, जुळे सोलापूर) यांचे तेलगाव येथून अपहरण झाले. सोलापूर तालुका पोलिसांनी तातडीने यंत्रणा हलवून 24 तासांच्या आत हेगोंडे यांची विजयपूर जिल्ह्यातील इंडी परिसरातील लच्छाण येथून सुटका करून अपहरण करणाऱ्या चौघांना अटक केली आहे. 

प्राध्यापिकेने "यामुळे' केला आत्महत्येचा प्रयत्न!

बसवण्णा शटगार, त्याचा मुलगा संगप्पा शटगार, सागर शटगार (रा. हिळ्ळी, ता. अक्कलकोट) आणि योगेश हनुमंत बाके (रा. मोदीखाना, गणपती मंदिराजवळ, सोलापूर) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. शिक्षक शांतप्पा हेगोंडे यांना सोमवारी दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास चौघांनी मारहाण करून अपहरण केल्याची घटना घडली होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास जगताप आणि त्यांचे पथक घटनास्थळी पोचले. त्यांच्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे यांनीही तेलगाव येथे भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या होत्या. 

पोलिसांनी तपासाला सुरवात केल्यानंतर बसवण्णा मलकण्णा शटगार (रा. हिळ्ळी, ता. अक्कलकोट) आणि शिक्षक हेगोंडे यांच्यात वाद झाल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी तातडीने इंडी येथे सहायक पोलिस निरीक्षक अनिल देवडे आणि पोलिसांचे पथक रवाना केले. पोलिसांनी सुरक्षितपणे शिक्षक हेगोंडे यांची अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून सुटका केली. पोलिसांनी बसवण्णा आणि त्याच्या साथीदारांना अटक केली. गुन्ह्यात वापरलेली दोन दुचाकी वाहने आणि शिक्षक हेगोंडे यांची दुचाकी जप्त केली आहे. 
शिक्षक शांतप्पा हेगोंडे यांनी चार ते पाच जणांबरोबर शेतीच्या जागेचा व्यवहार केला आहे. जागेच्या व्यवहारातून फसवणूक केल्यासंदर्भात त्यांच्या विरोधामध्ये अक्कलकोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिस तपासामध्ये समोर आली आहे. या प्रकरणामध्ये शटगार यांची देखील फसवणूक झाली आहे. त्या कारणावरून शिक्षक हेगोंडे यांचे अपहरण केल्याचे पोलिसांनी सांगितले. 
पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप, सहायक पोलिस निरीक्षक अनिल देवडे, सहायक फौजदार शेख, पोलिस नाईक कोणदे, पोलिस नाईक कोरे, पोलिस कॉन्स्टेबल गायकवाड, पवार, असिफ शेख, बिराजदार, फडतरे तसेच सायबर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी परिश्रम घेतले. 
-- 
..आणि झाली तपासाला सुरवात 
शिक्षक शांतप्पा हेगोंडे आणि बसवण्णा शटगार यांच्यामध्ये शेतीच्या व्यवहारातील पैशाच्या कारणावरून वाद होता. पाच ते सहा वर्षांपासून हेगोंडे पैसे देत नसल्यामुळे शटगार याने हेगोंडे यांना उचलून नेण्याचा निर्णय घेतला. चौघे जण तेलगावामध्ये आले. त्यावेळी शाळेच्या कामावरून हेगोंडे बाहेर जात होते. चौघांनी त्यांना तेलगाव ते डोणगाव जाणाऱ्या रस्त्यावर अडविले. मारहाण करून गाडीवर बसले. या वेळी शिक्षक हेगोंडे यांनी मदतीसाठी ओरडण्याचा प्रयत्न केला. शिक्षक हेगोंडे यांचा आवाज हा त्यांच्या शाळेमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या मुलीने ऐकला आणि हा प्रकार पाहिला. याबाबत माहिती पाचवीच्या मुलीने त्याच्या आईस दिली. आईने शाळेमध्ये जाऊन इतर शिक्षकांना याबाबतची माहिती दिली. शिक्षकांनी थेट पोलिसांना फोन करून माहिती दिल्यानंतर तपासकामाला सुरवात झाली.

महाराष्ट्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Of the teacher Kidnapping