कर्जाच्या अपेक्षेने शिक्षकाने भरले 1 लाख 8 हजार! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

सोलापूर : ऑनलाईन माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना गंडविले जात आहे. तीन लाख रुपयांचे वैद्यकीय कर्ज देतो म्हणून शिक्षकाला एक लाख आठ हजार 255 रुपये भरण्यास लावले. प्रोसेसिंग फी म्हणून थोडे थोडे पैसे बॅंक खात्यावरून स्वीकारले. त्यानंतर कर्ज न देता गंडविले. 

सोलापूर : ऑनलाईन माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना गंडविले जात आहे. तीन लाख रुपयांचे वैद्यकीय कर्ज देतो म्हणून शिक्षकाला एक लाख आठ हजार 255 रुपये भरण्यास लावले. प्रोसेसिंग फी म्हणून थोडे थोडे पैसे बॅंक खात्यावरून स्वीकारले. त्यानंतर कर्ज न देता गंडविले. 

शिक्षक असलेल्या नामदेव सौदागर कदम (वय 32, रा. अभिषेक पार्क लक्ष्मी पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 25 मे ते 2 जून 2018 या कालावधीत घडली आहे. विनोद शर्मा असे आरोपीचे नाव आहे. कदम यांना कर्ज हवे होते. त्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून कर्ज मिळविण्यासाठी शोध घेतला. ऑनलाइन जाहीरात पाहिली. तीन लाख रुपयांचे वैद्यकीय कर्ज घेण्याकरिता ऑनलाइन फॉर्म भरला. त्याआधारे विनोद शर्मा याने कदम यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन केला. व्हॉट्‌स ऍप क्रमांकावर कर्जासंदर्भातील कागदपत्रे पाठविली. विश्‍वास संपादन करून प्रोसेसिंग फी भरावी लागेल असे सांगितले. कदम यांच्याकडून वेळोवेळी थोडे थोडे करून पैसे घेतले. कर्ज न देता कदम यांची 1 लाख 8 हजार 255 रुपयांची फसवणूक केली. आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यानंतर कदम यांनी पोलिसात धाव घेतली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप तपास करीत आहेत. 

ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार सातत्याने घडत आहेत. नामदेव कदम यांनी कर्ज मिळवण्यासाठी वैयक्तिक माहिती ऑनलाईन भरली. विश्‍वास संपादन करून त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. नागरिकांनी ऑनलाईन माध्यमातून कर्ज घेणे टाळावे. अशाप्रकारे फसवणूक करणारे लोक महाराष्ट्राबाहेरील असतात. खात्री झाल्याशिवाय कोणताही व्यवहार करून नये. 
- संजय जगताप, 
वरिष्ठ पोलिस अधिकारी

Web Title: teacher pays 1 lakh 8 thousand for expections for loan