सेवाज्येष्ठता डावलून शिक्षकांच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

पाटण - प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली ऑनलाइन प्रक्रियेत घोळ आहे. कर्मचारी निवड प्रवर्ग, जात प्रवर्ग, सेवा सुरू तारीख आणि सेवाज्येष्ठता निकष डावलून अपात्र शिक्षकांच्या ग्रामविकास मंत्रालयाने बदल्या केल्या आहेत, असा आरोप होत आहे. 

पाटण - प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली ऑनलाइन प्रक्रियेत घोळ आहे. कर्मचारी निवड प्रवर्ग, जात प्रवर्ग, सेवा सुरू तारीख आणि सेवाज्येष्ठता निकष डावलून अपात्र शिक्षकांच्या ग्रामविकास मंत्रालयाने बदल्या केल्या आहेत, असा आरोप होत आहे. 

पारदर्शकतेचा डांगोरा पिटणाऱ्या शासनाने बदलीचा घोळ घातला आहे. शिक्षकांवर अन्याय केला आहे. गतवर्षी राज्यातील शासनाने आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाइन बदली प्रक्रिया राबविली. त्यामध्ये पारदर्शकता होती. मात्र, यावर्षी ग्रामविकास मंत्रालयाने राज्यातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेसाठी संगणकीय प्रणालीचे कंत्राट असणाऱ्या एन. आय. सी. पुणे या संस्थेला सर्व अधिकार दिले. या संस्थेने ता. आठ मे रोजी प्रक्रिया राबविली. ही राबविताना एकूणच अनागोंदी कारभार केला आहे. संवर्गाची नोंद, निवडीचा प्रवर्ग, नोकरी सुरू तारीख आणि महत्त्वाची सेवाज्येष्ठता डावलून या बदल्या केल्या असून, यामध्ये एन. आय. सी. पुणे या संस्थेतील अधिकारी, ग्रामविकास मंत्रालयातील अधिकारी व काही शिक्षकांनी हस्तक्षेप करून या बदल्यात गोलमाल केला असल्याचे काहींचे म्हणणे आहे. 

आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत पारदर्शकता न आणता मनमानी व सेवाज्येष्ठता नसणाऱ्या शिक्षकांच्या झालेल्या बदल्या संशय निर्माण करणाऱ्या आहेत. या संपूर्ण बदली प्रक्रियेची चौकशी करावी व अन्याय झालेल्या शिक्षकांची दखल घ्यावी, अन्यथा न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागेल, असा इशारा अन्यायग्रस्त शिक्षकांनी दिला आहे.

संगणकीय प्रणालीद्वारे केलेल्या बदल्यांमध्ये पारदर्शकता न ठेवता मनमानी कारभार झाला आहे. सेवाज्येष्ठता हा एक निकष जरी घेतला तरी संपूर्ण बदली प्रक्रियेतील गोंधळ समोर येईल. हा सर्व प्रकार पात्र शिक्षकांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पुन्हा राबवावी.
- रमेश बनकर, सचिव, राष्ट्रीय रोष्टर हक्क संघटना

बदली प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या विचाराने ही प्रक्रिया राबविली आहे. ज्यांना शंका आहे, त्यांनी आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदली संदर्भातील शासन निर्णयाचा अभ्यास केलेला नाही. या दोन्ही प्रक्रियेत प्रत्येक जिल्हा व तालुक्‍याला समान न्याय मिळणार आहे. 
- प्रदीप भोसले, राज्य समन्वयक, बदली प्रक्रिया

Web Title: teacher transfer