पुढील महिन्यापासून शिक्षक बदली प्रक्रिया 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन करण्याचा निर्णय युती सरकारने घेतला आहे. त्यानुसार मागील वर्षी हजारो शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या झाल्या.

सोलापूर - राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन करण्याचा निर्णय युती सरकारने घेतला आहे. त्यानुसार मागील वर्षी हजारो शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या झाल्या. यंदाच्या वर्षीही त्याच पद्धतीने बदल्या होणार आहेत. मात्र, राज्यात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीतील आचारसंहितेमुळे बदल्यांची प्रक्रिया रखडली आहे. पुढील महिन्यापासून शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू होण्याची शक्‍यता आहे. 

यंदाच्या वर्षीही शिक्षण विभागाने शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांसाठी वेळापत्रक निश्‍चित केले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने पुढील आदेश होईपर्यंत बदल्यांची प्रक्रिया थांबविण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या होत्या. राज्यात चार टप्प्यांत लोकसभा निवडणुका होत आहेत. पहिले दोन टप्पे पार पडले आहेत. आता तिसरा टप्पा 23, तर चौथा टप्पा 29 एप्रिलला पार पडणार आहे. एकूणच राज्यात लोकसभेच्या 48 जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर राज्यातील आचारसंहिता शिथिल होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मे महिन्यात शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांची प्रक्रिया चालू होण्याची शक्‍यता आहे. 

बदल्यांची माहिती ऑनलाइन भरताना शिक्षकांना 20 शाळांचे विकल्प दिले आहेत. ते विकल्प भरून हव्या त्या ठिकाणी त्यांना बदली करून घेता येणार आहे. आता एका शाळेवर तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर संबंधित शिक्षक जिल्हांतर्गत बदलीला पात्र होणार आहे. 

सोलापुरातील तीन हजार शिक्षकांच्या बदल्या? 
सोलापूर जिल्ह्यात मागील वर्षी जवळपास पाच-सहा हजार शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या वर्षी जिल्हांतर्गत बदल्या होणाऱ्या शिक्षकांची संख्या कमी असेल. यंदा जवळपास अडीच-तीन हजार शिक्षकांच्या बदल्या होण्याची शक्‍यता आहे. 
 

Web Title: Teacher transfer process for next month in solapur