शिक्षकच गेले चोरीला... गावकऱ्यांची अजब तक्रार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

जत - आजपर्यंत पैसे, दागिने, रोख रक्कम वा किमती वस्तू यांची चोरी झाली. अशा अनेक तक्रारी ऐकल्या. विहिरी चोरीला गेल्याचे पाहिले; पण जत तालुक्‍यातील लोकांनी शिक्षक चोरीला गेल्याची अजब तक्रार दिली आहे. सिंदूर या गावातील लोकांनी ही तक्रार केली आहे. ती पोस्टाने पोलिस मुख्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयालाही पाठवली आहे. 

सिंदूर गाव जतपासून दक्षिणेला २६ किलोमीटरवर कर्नाटक सीमेवर आहे. कन्नड व मराठी या द्विभाषिक गावात जिल्हा परिषदेच्या कन्नड व मराठी शाळा आहेत; पण १८ महिन्यांपासून तिथे शिक्षकच नाहीत. एकाची नेमणूक करण्यात आली. अर्जुन रुपेशराव काटे हे ते शिक्षक. ते अठरा महिने शाळेत येत नाहीत. शाळेतील मुली-मुले विना शिक्षक शाळेत बसून जातात. गेल्यावर्षी मुले व पालकांनी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन केले. त्याची दखल घेतली गेली नाही.

यंदाच्या वर्षात तरी शिक्षक मिळतील, अशी अपेक्षा होती. तसे झाले नाही. नेमणूक असलेले शिक्षक येत नाहीत याबाबत ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे चौकशी केली. त्यावेळी शिक्षकाचा पगार त्याच शाळेतून काढला जातो असे कळले. शासन दप्तरी तो येथे काम करीत  असल्याची धक्कादायक माहिती मिळाली. मात्र शाळेत शिक्षकच नसल्याने मुलांचे नुकसान होत असल्याने ग्रामस्थांनी शक्कल लढवली. त्यांनी चक्क शिक्षक  चोरीला गेल्याची तक्रार दिली. ही तक्रार पोस्टाने जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, तहसीलदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवली आहे. त्यावर योग्य तो तोडगा काढून मुलांना न्याय मिळावा, शिक्षक उपलब्ध करून द्यावा, ही मागणी आहे.

Web Title: The teacher was stolen complaint crime