ड्रेसकोडला सोलापूरच्या गुरुजींचा विरोध

ड्रेसकोडला सोलापूरच्या गुरुजींचा विरोध

सोलापूर- जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद शाळेतील गुरुजींना ड्रेसकोड करण्याचा निर्णय झाला. सर्वसाधारण सभेने घेतलेल्या या निर्णयाला शिक्षक संघटनांनी जोरदार विरोध केला आहे. काहीही झाले तरी गुरुजी गणवेश घालणार नाहीत, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. दरम्यान, जिल्हा परिषद सदस्यांनाही ड्रेसकोड असावा, याबाबतची जोरदार चर्चा सोशल मिडियावर सुरू आहे. 

शाळेमध्ये जाणारे गुरुजी ओळखता यावेत, यासाठी त्यांना जर ड्रेसकोड करणार असाल तर आपल्या भागातील जिल्हा परिषदेचा सदस्य कोण आहे हे लोकांना ओळखू यावे, यासाठी त्यांनाही ड्रेसकोड करण्याची मागणी शिक्षकांनी सोशल मिडियावर केली आहे. गुरुजींना गणवेश करण्यापेक्षा त्यांची इतर कामातून सुटका करण्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे. गुरुजी पांढरे कपडे घालतात हे सदस्यांना का टोचते अशीही चर्चा दिवसभर सुरू होती. जिल्हा परिषद सदस्यांच्या मतदारसंघात मोठे खड्डे आहेत, त्याठिकाणी त्यांनी आंदोलन केले का? शिक्षकांनी लोकवर्गणी करून शाळा चांगल्या केल्या तर सदस्यांचा शिक्षकांच्या गणवेशावर डोळा, रिक्त पदांबाबत सदस्य बोलत नाहीत, मागील वर्षीचे पोषण आहाराचे बिल मिळाले नाही, अशीही चर्चा सोशल मिडियावर रंगली होती. गुरुजींना ड्रेसकोड करा म्हणणाऱ्या सदस्यांनी गुरुजींच्या कौतुकाचा एक तरी ठराव संमत केला का? असाही प्रश्‍न विचारला गेला. 

एकूणच मंगळवारी झालेल्या निर्णयाला गुरुजींसह शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. त्यामुळे याविषयी जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी काय निर्णय घेतात याकडे जिल्ह्यातील गुरुजींचे लक्ष लागले आहे. 

राष्ट्रीय सणांच्यावेळी प्रत्येक शाळेने ड्रेसकोड निश्‍चित केला आहे. त्याचबरोबर इतर सामूहिक कार्यक्रमातही गणवेश घातला जातो. त्यामुळे आता वेगळा गणवेश करण्याची गरज नाही. वेगळा गणवेश करण्याला आमचा विरोध राहील. 
म. ज. मोरे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक संघ (थोरात गट) 


जिल्हा परिषदेच्या सभेत झालेल्या निर्णयाबाबत महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे त्या निर्णयाला आमचा तीव्र विरोध राहील. - अनिल कादे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक समिती. 

प्राथमिक शिक्षकांना "गुरुजी' म्हणून ओळखण्यासाठी गणवेश लादत असाल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. सदस्यांनी शिक्षकांबद्दल आदर ठेवावा. पुन्हा गणवेश सुरू करण्यास आमचा विरोध राहील. - शिवानंद भरले, जिल्हाध्यक्ष, शिक्षक संघ (पाटील गट)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com