#शिक्षकदिन : जिवंत मूर्ती घडविणारे शिक्षक

Teacher
Teacher

शाळा म्हणजे ज्ञानमंदिरच. साक्षात येथे मूर्ती घडतात. दगडांना आपल्या कलानैपुण्याने दैवत्व देणाऱ्या मूर्तिकाराप्रमाणे शिक्षक मुलांना घडवतात. जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात असे शेकडो मूर्तिकार भावी पिढी घडवत आहेत. त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केल्याशिवाय ‘शिक्षक दिन’ अपूर्ण राहील. ‘सकाळ’ने प्रातिनिधिक स्वरूपात कर्तृत्ववान शिक्षकांच्या उपक्रमशीलतेवर टाकलेला हा प्रकाशझोत...

शिष्यवृत्तिधारकांचा किंगमेकर
सावली (ता. जावळी) येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील श्‍यामराव जुनघरे यांनाराज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. भोगवली मुरा (ता. जावळी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांचे आतापर्यंत ५३ विद्यार्थी शिष्यवृत्तिधारक ठरले आहेत. शिष्यवृत्ती अभ्यासक्रमनिर्मिती सदस्य म्हणून त्यांनी काम केले असून, शोधनिबंध स्पर्धेत दोन वेळा राज्यस्तरावर बक्षीस मिळाले आहे. सलग पाच वर्षे राज्यस्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणू०न काम केले. त्यांचा ‘शब्दसुमने’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. यापूर्वी प्रथम या संस्थेचा राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहेत.  

अविरत कर्मयोग
दापकेघर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत सुनीता गायकवाड या ज्ञानदानाच्या कार्यामुळे अल्पावधीतच प्रसिध्द झाल्या. गत वर्षापर्यंत त्या खंडाळ्यातील लोणंद क्रमांक एक या उच्च प्राथमिक शाळेमध्ये कार्यरत होत्या. त्यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्‍यातील सर्वाधिक विद्यार्थी हे या शाळेतील शिष्यवृत्तिधारक झाले. शाळेच्या वेळेव्यतिरिक्‍त सकाळी दोन तास, स्वतःच्या घरी सायंकाळी सहा ते नऊ या कालावधीत, तर रविवारीही शिष्यवृत्तीचे जादा तास घेतले. विशेष म्हणजे याच कालावधीत तीन महिन्यांच्या अंतराने त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. डोंगराएवढे दुःख बाजूला सारून, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी दीर्घकाळ रजेवर न जाता, तत्काळ शाळेवर हजर होऊन पूर्वीप्रमाणे तासिका सुरू केल्या. यामुळे शिष्यवृत्तीचा निकाल लागायच्या आधीच अनेक पालकांनी एकत्र येऊन आमची मुले शिष्यवृत्तिधारक होणार, हे गृहीत धरून या शिक्षिकेचा गौरव केला.

नावलौकिक वाढविला
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोसावीवस्ती (ता. माण) शाळेत गुणवत्तेचा ध्यास, विकासाची कास धरूनच मुख्याध्यापिका भारती ओंबासे यांनी काम केले. त्याला प्रभावीपणे उपशिक्षक वैभव काटकर यांची साथ लाभली. काही दिवसांत या द्विशिक्षकी शाळेला आयएसओ मानांकन मिळवून शाळेचा नावलौकिक वाढविला. शाळेच्या भौतिकतेबरोबर पट व गुणवत्तेचा आलेख दरवर्षी वाढत आहे. शाळेत दैनंदिन अध्यापनाबरोबर बीडीएस, एनएसएसई, आयटीएसई, मंथन अशा विविध स्पर्धा परीक्षेत सलग चार वर्षे २२ ते २३ विद्यार्थी राज्याच्या व देशपातळीवर झळकले आहेत. 

हरहुन्नरी शिक्षक
शैक्षणिक साहित्य निर्मितीत हातखंडा असलेले प्राथमिक शिक्षक गणेश शिंदे हे सध्या मोरबाग (ता. सातारा) प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. शैक्षणिक साहित्य निर्मितीत त्यांचा हातखंडा असल्यामुळे इन्स्पायर ॲवॉर्ड, विज्ञान प्रदर्शनात त्यांची राज्यस्तरावर निवड झाली. अनेक कार्यशाळांतून त्यांनी याविषयी मार्गदर्शन केले आहे. क्रीडा प्रबोधिनीचे मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी लक्षवेधक कामगिरी बजावली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुक्‍यातून १५ विद्यार्थ्यांची क्रीडा प्रबोधिनीसाठी निवड झाली. त्यातील काही खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवरही यश पटकावले. त्यांची आतापर्यंत दहा शैक्षणिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. शिक्षकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी शिक्षक सहविचार मंचची स्थापना केली आहे.

शाळेला दिला लौकिक
अंबवडे (संमत वाघोली, ता. कोरेगाव) प्राथमिक शाळेतील शिक्षक सचिन क्षीरसागर यांना तालुकास्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला असून, यावर्षीच्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे. ज्ञानदान करता करता क्षीरसागर यांनी या शाळेचे रूपडे पालटवले. शाळेतील दहा विद्यार्थी शिष्यवृत्तिधारक झाले आहेत. नवोदय विद्यालय, शासकीय विद्यानिकेतनसाठी तीन विद्यार्थी प्रवेशपात्र ठरले असून, एका विद्यार्थ्याची क्रीडा प्रबोधिनीसाठी निवड झाली आहे. अपघातामुळे जखमी झालेल्या तीन विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी क्षीरसागर यांनी स्वतः साह्य केले असून, हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या पाच विद्यार्थ्यांचा शालेय खर्चही त्यांनी केला आहे.

शिक्षणातील पंढरी
प्रवीण इंगोले यांची २००७ मध्ये पाटणहून विखळे (ता. खटाव) येथील जिल्हा परिषद शाळेत बदली झाली. त्यावेळी केवळ द्विशिक्षकी असणाऱ्या शाळेला आता सहा शिक्षक मंजूर आहेत. त्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने आज शाळेचे रुपडेच बदलून गेले आहे. आयएसओ मानांकन, गुणवत्ता विकास कार्यक्रमात जिल्ह्यात प्रथम असलेल्या या शाळेचा चेहरा बदलण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. शाळा इमारत दुरुस्ती, बोलक्‍या भिंती, सुसज्ज ग्रंथालय, बैठक व्यवस्था, आकर्षक शाळा परिसर यामुळे मुलांचा अभ्यासातील व्यासंग वाढला आहे. ही शाळा म्हणजे इंटरनॅशनल स्कूलप्रमाणेच बनली आहे. ज्ञानरचवाद, आनंददायी अध्ययन व अध्यापन, ‘टॅब’द्वारे मुले शिक्षण घेतात. गावची लोकसंख्या कमी असून, गावातील मुले केवळ ४२, तर बाहेरून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २२० इतकी आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील ही शिक्षणातील पंढरी ठरली आहे. 

पुरस्कारांचा मानकरी
लोकसहभागातून शाळेचा कायापालट करत शैक्षणिक दर्जाही सुधारता येतो, हे दक्षिण तांबवे (ता.कऱ्हाड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक आबासाहेब साठे यांनी सिद्ध केले आहे. विद्यार्थ्यांसाठी ३५ हून अधिक उपक्रम राबवत तालुक्‍यातील शैक्षणिक दर्जात अव्वल शाळा म्हणून नावलौकिक मिळविला. त्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनीही गौरवले आहे. दक्षिण तांबवे येथे लोकांच्या मागणीनुसार शाळा सुरू झाली. ती चालेल की नाही, अशी स्थिती होती. मात्र, जसे आबासाहेब साठे व मनीषा साठे हे शिक्षक दांपत्य मिळाले तसा शाळेचा नुरच पालटला. शाळेच्या भौतिक सुधारणांनतर रविवारी सुटीच्या दिवशी, दररोज सकाळी आणि संध्याकाळी दोन-दोन जादा तास अभ्यासिका घेऊन त्यांनी विद्यार्थ्यांची बौद्धिक सुधारणा केली. त्यामुळे दरवर्षी त्या छोट्याशा शाळेतील अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकतात. त्यांना शिक्षण विभागासह अन्य सामाजिक संस्थांच्या विविध पुरस्कारांनीही गौरवले आहे.

नॉनस्टॉप ज्ञानयज्ञ
मुलांमधील ‘बेस्ट’ एकदा बाहेर काढले की यशाचे शिखर गाठणे अवघड जात नाही. मुलांमधील आंतरिक ऊर्जा जाणून तिच्या सकारात्मक परिणामासाठी पुनर्वसित माझेरी (ता. फलटण) येथील शाळेचे मुख्याध्यापक भोलचंद बरकडे नेमके हेच करतात. त्याला कृतिशील साथ देतात ते उपशिक्षक रमेश पोमणे. खेळ ही मुलांची सहज प्रवृत्ती, त्याचाच आधार घेऊन मुलांना त्यांनी शाळेबद्दल ओढ निर्माण केली. मुले शाळेत रमू लागली, शाळा सुटल्यानंतरही मैदानावर खेळू-बागडू लागली. बघता-बघता विद्यार्थीसंख्या शंभरीत पोचली. सलग पाच वर्षे तालुक्‍याला जिल्हा क्रीडा चॅम्पियनशिप मिळवून दिली. गेल्या दोन वर्षांत ३५ पैकी २७ विद्यार्थी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत चमकले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com