मांजाने गळा कापलेल्या शिक्षकांनी घेतले अनोखे व्रत

अमित आवारी
Tuesday, 14 January 2020

"सेल्फ केअर फाउंडेशन'ची स्थापना करून ते सध्या सपत्नीक प्रबोधन करत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते पुणे, नगर, औरंगाबाद व नाशिक शहरात सर्वत्र जनजागृती करत आहेत.

नगर : मकर संक्रांत पुण्यातील रस्त्यावर एक शिक्षक दुचाकीवरून चालले होते. रस्त्यात आडवा असलेला पतंगाचा मांजा न दिसल्याने त्यांचा गळा कापला गेला. यात ते गंभीर जखमी झाले. मृत्यूशी दोन हात करून ते वाचले. त्या शिक्षकाने जगात कोणी आपल्यासारखी चूक पुन्हा करू नये, यासाठी शिकवण देण्याचे ठरविले. प्रवीण धायतडक असे या शिक्षकाचे नाव. "सेल्फ केअर फाउंडेशन'ची स्थापना करून ते सध्या सपत्नीक प्रबोधन करत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते पुणे, नगर, औरंगाबाद व नाशिक शहरात सर्वत्र जनजागृती करत आहेत. शाळा-महाविद्यालयांत प्रबोधन आणि यू-ट्यूब, रेडिओ, सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृतीचे काम सुरू आहे. 

अवश्‍य वाचा - मराठा सेवा नागरी पतसंस्थेचे कामकाज ठप्प 

मकर संक्रांत जवळ आली की लहानांपासून तरुणांपर्यंत सर्व जण पतंग उडविण्याचा आनंद घेतात. आकाशातील इतर पतंगांशी स्पर्धा करण्यासाठी गोतही खेळतात. आपला मांजा कापलाच जाऊ नये, यासाठी स्वस्त व मजबूत असलेला नायलॉनचा चिनी मांजा काही उत्साही लोक घेत आहेत. हा मांजा लवकर कापला जात नाही आणि सहज दिसतही नाही. त्यामुळे प्रवास करताना पक्ष्यांपासून माणसापर्यंत सर्वांसाठी तो घातक ठरत आहे. शासनाने या मांजावर बंदीही आणली आहे. मात्र, हा मांजा चोरट्या पद्धतीने आजही बाजारपेठेत विकला जात आहे. चिनी मांजामुळे आतापर्यंत अनेक जण गंभीर झाले आहेत. 

हेही वाचा- शिवथाळीला मिळाला अखेर "हा' मुहूर्त 

manja

नगर : चिनी मांजावर बंदीबाबत जनजागृती करताना प्रवीण धायतडक व सविता धायतडक.

"सेल्फ केअर फाउंडेशन'द्वारे जनजागृती

अनेक पक्ष्यांनाही जीव गमवावा लागला आहे. पुण्यात तर "सकाळ'च्या कर्मचारी सुवर्णा मुजुमदार यांच्यासह दोन महिला मांजाने गळा चिरल्याने मृत्युमुखी पडल्याच्या घटना गेल्या दोन वर्षांत घडल्या. प्रवीण धायतडक हे 23 फेब्रुवारी 2016 रोजी शिवाजीनगर येथील आरटीओ चौकामध्ये चिनी मांजा गळाला लागल्याने गंभीर जखमी झाले होते. पतंगाचा तुटलेला मांजा हेल्मेटला लागून गळ्याभोवती गुंडाळला जाऊन गळा कापला गेला. गळ्याला दहा टाके पडले. मृत्यूशी झुंज दिलेल्या धायतडक यांनी पत्नी सविता धायतडक यांच्या मदतीने "सेल्फ केअर फाउंडेशन' ही संस्था काढली. सविता या संस्थेच्या अध्यक्ष आहेत. 

सोशल मीडियाचाही वापर

ही संस्था गेल्या तीन वर्षांपासून पुणे, नगर, औरंगाबाद व नाशिक या शहरातील प्रत्येक चौक, शाळा, महाविद्यालये, चौक, पतंगविक्रेते, ट्रॅफिक सिग्नलवर फलक, व्याख्याने, विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत. या मोहिमेतून चिनी मांजापासून दक्षता घेण्याची माहिती दिली जाते. नगर शहरात या वर्षी त्यांनी आतापर्यंत 30 शाळांमध्ये कार्यक्रम केले. या वर्षी 50 शाळांचे उद्दिष्ट आहे. याशिवाय सोशल मीडियाचाही मोठ्या प्रमाणात वापर हे दाम्पत्य करत आहे. त्यांच्या ग्रुपमध्ये डॉक्‍टर व इंजिनिअरही आहेत. 

अशी घ्या दक्षता 

  • पतंग उडविताना चिनी मांजाचा वापर टाळा 
  • विजेच्या तारांपासून सावध राहा 
  • उंच इमारतीऐवजी मोकळ्या जागेवर पतंग उडवा 
  • काच वापरलेला मांजा वापरू नका
  • तुटलेल्या पतंगांच्या मागे धावू नका 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers make awareness of manja marathi news