पगारासाठी शिक्षकांना आधार कार्ड सक्तीचे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

कोल्हापूर -आधार कार्ड नसलेल्या शिक्षकांचे पगार या महिन्यापासून काढले जाणार नाहीत. त्यासंबंधी शालार्थ संकेतस्थळावर गेल्या महिन्यात सूचना देण्यात आली. नोव्हेंबरचा पगार जमा झाला. मात्र, डिसेंबरच्या पगारासाठी आधार कार्डची सक्ती केली गेली आहे. पगार न काढण्याची सूचना राज्य शासनाने वेतन पथकांना दिली आहे. आधार कार्ड असेल तरच पगार होईल, अन्यथा पगारबिले स्वीकारली जाणार नाहीत. 

कोल्हापूर -आधार कार्ड नसलेल्या शिक्षकांचे पगार या महिन्यापासून काढले जाणार नाहीत. त्यासंबंधी शालार्थ संकेतस्थळावर गेल्या महिन्यात सूचना देण्यात आली. नोव्हेंबरचा पगार जमा झाला. मात्र, डिसेंबरच्या पगारासाठी आधार कार्डची सक्ती केली गेली आहे. पगार न काढण्याची सूचना राज्य शासनाने वेतन पथकांना दिली आहे. आधार कार्ड असेल तरच पगार होईल, अन्यथा पगारबिले स्वीकारली जाणार नाहीत. 

वित्त व नियोजन विभागाने शासनाच्या सर्व खात्यांचे "सर्जिकल स्ट्राइक' करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून प्रत्येक विभागात किती पदे कार्यरत आहेत. प्रत्येक पदाचा वर्कलोड किती? याची माहिती घेतली जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अमुक एका विभागाने आर्थिक तरतुदीची मागणी केली, तेवढी अर्थसंकल्पात तरतूद केली जाते. मात्र सप्टेंबर उजाडला की दैनंदिन भत्ता देण्यास पैसे नसतात, अशी अनेक विभागांची अवस्था आहे. त्यामुळे पदे दाखविली तरच पगार काढण्याच्या दृष्टीने शासनाने पावले टाकली आहेत. प्रत्येक विभागाकडून माहिती एकत्रित केली जात आहे. 

शिक्षण विभागात पदांच्या संख्येबरोबर एका शाळेतील विद्यार्थी संख्येचा तपशील देण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शिक्षकांच्या पगारापोटी नेमकी किती रक्कम खर्च होते. प्रत्यक्षात तेवढी पदे कार्यरत आहेत का ? याचा आढावा घेतला जाणार आहे. दरवर्षी संच मान्यतेतून पदांचा आढावा घेतला जातो. प्रशासकीय स्तरावर कनिष्ठ लिपिक, असो किंवा शिपाई, प्रत्येकाला नेमके काम किती? याचाही आढावा घेतला जाणार आहे. 

काम कमी आणि पदांची संख्या जास्त, असे शासनाच्या निदर्शनास आले तर संबंधिताचे अन्य समायोजन अथवा पद रद्द अशी कारवाई होण्याची शक्‍यता आहे. 

जिल्ह्यातील माध्यमिक शाळांसाठी वेतन पथकातून महिन्याला पगारापोटी सुमारे 42 कोटी खर्च होतात. प्राथमिक शिक्षकांच्या पगारापोटी सुमारे चार कोटी रुपये खर्च होतात. ज्या शिक्षकांनी आधारकार्ड काढलेली नाहीत त्यांची पगारबिले डिसेंबरपासून स्वीकारली जाणार नाहीत. ऑनलाइन पगारबिल पडले की तेथेच आधारकार्डचा क्रमांक विचारला जाईल. 

आधार कार्डसाठी धावाधाव 

माध्यमिकला बाराशेहून अधिक शाळा जोडल्या गेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा पगार स्वतंत्र यंत्रणेमार्फत काढला जातो. शिक्षक प्राथमिक असो माध्यमिक संबंधिताचे आधारकार्ड आवश्‍यक आहे. नोटाबंदीमुळे झालेला पगार पूर्ण क्षमतेने होईल की नाही, याची चिंता असताना आता आधार कार्डसाठी धावाधाव करावी लागणार आहे.

Web Title: Teachers salary compulsory aadhar card