शिक्षकाची आध्यात्मिक दिवाळी

शिक्षकाची आध्यात्मिक दिवाळी

नगर ः दिवाळीच्या सुटीची विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकही आतुरतेने वाट पाहत असतात. सुटी लागली, की सहकुटुंब सहलीला जाण्याचे मनसुबे आखतात. या काळात एक शिक्षक, तोही इंग्रजी विषय शिकविणारा... हाती वीणा घेत वारीला निघतो. सुटीत पायी वारी करून आध्यात्मिक दिवाळी साजरी करतो.


पाथर्डी तालुक्‍यातील जवखेडे येथील कानिफनाथ माध्यमिक विद्यालयात भारत कांबळे हे शिक्षक 22 वर्षांपासून अध्यापनाचे कार्य करतात. ते तिसगावात राहतात. सुटी लागली, की भाऊबीजेपर्यंत कुटुंबीयांसह घरी दिवाळी साजरी करतात. पत्नीला भाऊबीजेला माहेरी सोडून दुसऱ्या दिवशी आपली आध्यात्मिक सहल सुरू करतात. एसटीने थेट आळंदी गाठतात. दोन दिवस ज्ञानेश्‍वर माऊलींच्या समाधीजवळील अजानवृक्षाजवळ ज्ञानेश्‍वरीचे मनोभावे पारायण करतात. पारायण होताच पुन्हा घरी येतात. स्वच्छ धुतलेल्या कपड्यात गुंडाळलेली वीणा हाती घेतात, जवळ पांघरण्यासाठी शाल घेतात, खांद्यावर कपड्यांची पिशवी घेत पंढरपूरच्या दिशेने पायी प्रवास सुरू करतात.

वाटचालीत मुक्काम पडला, तर एखाद्या मंदिराचा आसरा शोधतात. सकाळी पुन्हा पंढरीकडे मार्गस्थ होतात. जेवणाची सोय आपोआप होते. वीणेकरी वारकऱ्याला भाविक आवर्जुन जेवणाचे निमंत्रण देतात. रोज 50 किलोमीटरचे अंतर ते कापतात. चार ते पाच दिवसांत पंढरीच्या पांडुरंगाच्या दरबारात पोचतात. चंद्रभागेचे स्नान करून ते दर्शनाच्या बारीमध्ये उभे राहातात. रांगेत उभे राहून पांडुरंगाचे नाव घेतात. दर्शन होईपर्यंत त्यांचे नामस्मरण अखंड सुरू असते.पांडुरंगाचे मनोभावे दर्शन घेतात. पांडुरंगांचे सावळे मनोहर रुप मनात साठवितात. पंढरपूरमध्ये नगर प्रदक्षिणा करून सर्व मंदिरात व मठात जाऊन देवांचे व साधू संताचे दर्शन घेतात. परतीच्या प्रवासाला निघतात. तोपर्यंत शाळा सुरू होण्याची लगबग सुरू झालेली असते. आध्यात्मिक आनंद मनात साठवत कांबळे सर इंग्रजीचे धडे विद्यार्थ्यांकडून पुन्हा गिरवून घेतात.

गेल्या 14 वर्षांपासून, शिवरात्रीनंतर दुसऱ्या दिवशी आडगाव (ता. पाथर्डी) येथील ग्रामस्थ व भारत कांबळे हे संत रोहिदास महाराज जयंतीचा मोठा कार्यक्रम घेतात. याशिवाय कांबळे यांनी आरोग्य व मोतीबिंदू शिबिरेही घेतली आहेत.

दिवाळीच्या सुटीत परमार्थ घडतो व मनाला समाधान मिळते. मोकळ्या वेळात नको तेथे जाऊन पैसे खर्च करण्यापेक्षा अध्यात्मावर झालेला खर्च काय वाईट? भावी पिढी सदाचारी, सन्मार्गी व्हावी, याच हेतूने गेल्या 14 वर्षांपासून आध्यात्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे.
भारत कांबळे, शिक्षक व वारकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com