कोयत्याने हरीण, वाघ, गाय, बैल तयार करण्याचे अजब तंत्र  

Strange Technique Of Producing Deer, Tigers, Cows And Bulls By Nife
Strange Technique Of Producing Deer, Tigers, Cows And Bulls By Nife

कोल्हापूर - कोयता व ग्राइंडरने खेळणी करण्याचं गुंडा पांडुरंग कांबळे यांचं अजब तंत्र. काही शिकण्यासाठी गुरू करावाच लागतो, असा सिद्धांत त्यांना लागू पडला नाही. लाकडाची खेळणी बनवण्याचं कौशल्य त्यांनी मेहनतीने आत्मसात केलं. तासन्‌ तास एकाच जागेवर बसून लाकडाला आकार देण्यात वेळ खर्ची घातला. गुंडाअण्णाच्या हाताला भारी सर हाय, असा गावात बोलबोला झालाय. खेळणी कारागीर, शेतमजूर, ट्रॅक्‍टर ड्रायव्हर या वर्तुळातला अण्णांचा प्रवास मात्र थांबलेला नाही. 

चित्रकलेतुन खेळण्याकडे प्रवास

चित्रं काढण्याचा गुंडा अण्णाला छंद. तिसऱ्या इयत्तेपर्यंत शाळेची पायरी चढण्याचं अण्णाच्या नशिबात होतं. शिक्षणाची दोरी तिसऱ्या इयत्तेत कापली गेली. अण्णाच्या अंगात चित्रकला मात्र पुरती मुरली होती. आई-वडील, चार भाऊ अशा मोठ्या कुटुंबात त्यांना शिक्षण घेणं परवडणारं नव्हतं. पंधरा गुंठ्यातील पिकातून हातात फारसं काही लागायचं नाही. ब्रश, रंगपेटी खरेदी करायची अडचण होती. सदाशिव, मधुकर, विलास भावंडांबरोबर अण्णाची राबणूक सुरू झाली. शेतमजूर, ट्रॅक्‍टर ड्रायव्हरच्या कामातून त्यांची आजही सुटका झालेली नाही.

लहानपणी राबणुकीचं काम करताना त्यांच्या मनातली चित्रं कागदावर आकार घेत होती. लाकडाची खेळणी करण्यासाठी हातांची कसरत सुरू होती. त्याच्या ‘टेक्‍निकली’ शिक्षणाचा अंश अण्णांच्या रक्तात नव्हता. खेळण्याला सुबकता आणण्यासाठीची हत्यारंही त्यांच्याकडे नव्हती. घरातल्या कोयत्याचे घाव लाकडावर घातल्यानंतर छोटं हरीण, वाघ आकाराला आला. 

अख्या गावाला या कलेच कौतुक 

बेंदराला मातीचे बैल करण्यात अण्णा कमी पडत नव्हते. शेजारची पोरंटोरं मातीच्या बैलांसाठी त्याच्याभोवती फेर धरायची. लाकडाची बैलं करण्याचा विचार त्याच्या डोक्‍यात होताच. लाकडाची बैलं करण्याचं अण्णानं ठरवल्यावर अण्णाला वरीस लागणार बैलं करायला, असा चर्चेचा धूर गावात पसरला. पंधरा दिवसांत लाकडाची बैलजोडी तयार झाल्यावर अनेकांच्या पोटातली मळमळ थांबली. अण्णाचं कौतुक करण्याशिवाय त्यांना पर्याय राहिला नाही.

अण्णानं लाकडी चाकं तयार केली. बैलजोडीबरोबर बैलगाडी तयार होत असल्याचं गावकऱ्यांच्या लक्षात आलं. अण्णाचा हुरुप वाढत गेला. लाकडी प्राणी करण्याचा विचार डोक्‍यात घोंगावला. सागवानी लाकूड महाग. खिशात पैशाची तजवीज झाल्यानंतर अण्णाच्या दारात सागवानी लाकूड आलं. लाकडी कुत्रा, घोडा, गवा तयार झाला. फिनिशिंगसाठी ग्राइंडरचा उपयोग करण्यात आला. रंधा, करवत, पातळीशिवाय अण्णानं केलेलं काम शाबासकी घेणारं ठरलं. गावातल्या पारावर अण्णाच्या करामती चर्चेत आल्या. लाकडी सोंड, वाघ, हरीण विक्रीसाठी ठेवण्यात आली, लाकडी मोठी गाय व गवा तयार करताना अण्णाला मोजमापाची गरज भासली नाही. डोक्‍यात साठलेलं रूप लाकडात उतरण्यात अण्णानं दिवस-रात्र एक केला.

या कलेतुन उद्योग उभारण्याकडे वाटचाल

गगनबावडा तालुक्यातलं लोंघे गाव अण्णाच्या लाकडी खेळण्यांमुळे तालुक्‍यात चर्चेत आलं. कोल्हापुरात बचत गटांच्या प्रदर्शनात ती मांडण्यात आली होती. अनिल कुंभार यांच्या लोंघे फाट्यावरच्या हार्डवेअरच्या कारखान्यात अण्णांचा आजही ठिय्या असतो. तेथेच ते खेळणी बनविण्याच्या उद्योगाला चालना देत आहेत. अण्णांचं शिक्षण तिसरीत भलेही सुटले, त्यांच्या दोन मुली बारावीपर्यंत शिकल्या.‘खेळणी केल्यावर कुठं चुकतंय, हे माझ्या लक्षात येतं. पुढच्या खेळण्यात ती चूक मी दुरुस्त करतो,’ असं सांगायला अण्णा विसरत नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com