कोल्हापुरात सराफ पेढीवर दरोडा; 35 लाखांचा ऐवज पळविला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मार्च 2017

येथील ताराबाई रोडवरील सराफ पेढी फोडून चोरट्यांनी 65 तोळ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांसह 14 लाख रुपयांची रोकड असा सुमारे 35 लाख रुपयांचा ऐवज पळवला. पेढीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन चोरटे कैद झाले आहेत. जुना राजवाडा पोलिसांत याची नोंद झाली आहे. याबाबतची फिर्याद किरण हिरासा झाड यांनी दिली.

कोल्हापूर - येथील ताराबाई रोडवरील सराफ पेढी फोडून चोरट्यांनी 65 तोळ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांसह 14 लाख रुपयांची रोकड असा सुमारे 35 लाख रुपयांचा ऐवज पळवला. पेढीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन चोरटे कैद झाले आहेत. जुना राजवाडा पोलिसांत याची नोंद झाली आहे. याबाबतची फिर्याद किरण हिरासा झाड यांनी दिली.

याबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : तटाकडील तालीम चौकात किरण हिरासा झाड यांची सराफ पेढी आहे. सोन्याच्या मण्यांसह दागिने ऑर्डरप्रमाणे ते कारागिरांकडून तयार करून ग्राहकांना देतात. त्यांच्याकडे सात कारागीर काम करतात. पेढीच्या दोन मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील पाठीमागील खोलीत कारागीर काम करतात. पहिल्या मजल्यावर उजव्या बाजूस त्यांची पेढी आहे. डाव्या बाजूस खोलीत तयार केलेले सोन्याचे दागिने व रोकड ते ठेवतात. पहिल्या खोलीत कारागिरांची वाहने लावली जातात. त्यामुळे तो दरवाजा उघडचा असतो. पेढी सकाळी नऊ ते सायंकाळी सातपर्यंत उघडी असते. झाड यांना त्यांच्या कामात त्यांचा मुलगा पियूष मदत करतो. झाड यांचा पुतण्या रोहन रोज रात्री पेढीत झोपतो.

व्यवसायासंबंधी शुक्रवारी सकाळी झाड बेळगावला गेले होते. तेथून ते गोव्याला गेले. नेहमीप्रमाणे त्यांचा मुलगा पियूष यांनी पेढी उघडली. कारागीरही काम करून सायंकाळी निघून गेल्यानंतर सातच्या सुमारास पियूष यांनी पेढी बंद केली. रात्री पावणेदहाच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांनी मुख्य दरवाजाची कडी काढून आत प्रवेश केला. त्यानंतर तो दरवाजा लावून बंद केला. आतील दरवाजाचे मोठे कुलूप त्यांनी तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर ते पहिल्या मजल्यावर गेले. उजव्या बाजूस पेढीला लावलेला काचेचा दरवाजा चोरट्यांनी फोडला व आत प्रवेश केला. तेथील टेबलावर वाळत ठेवलेले सोन्याचे दागिने, ड्रॉव्हरमधील सोन्याचे दागिने आणि रोकड पळविली. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा पेढीच्या डाव्या बाजूच्या खोलीकडे वळवला. तेथे त्यांना तिजोरीच्या चाव्या सापडल्या. त्याच्या साह्याने तिजोरी उघडून त्यातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण 35 लाखांचा ऐवज पळविला. चोरट्यांनी कारागिरांच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि ते पाठीमागील बाजूने पळून गेले.

दरम्यान, पावणेदहाच्या सुमारास झाड यांचा पुतण्या रोहन झोपण्यासाठी पेढीवर आला; मात्र त्याला मुख्य दरवाजा आतून बंद असल्याचे निदर्शनास आले. आत कोण आहे याची हाका मारून त्याने सुरवातीला विचारणा केली; मात्र आतून त्याला प्रतिसादच मिळाला नाही. त्याने शेजारी राहणाऱ्या सुनील मिस्किन यांच्या जिन्यावरून पेढीच्या टेरेसवर गेला. तेथून तो पहिल्या मजल्यावर पेढीच्या दिशेने आला; मात्र त्याला पेढीचा काचेचा दरवाजा फोडल्याचे निदर्शास आले. तसा त्याला धक्का बसला. तो तातडीने बाहेर आला. त्याने याची माहिती काका किरण झाड व त्यांचा मुलगा पियूष याला फोनवरून दिली. तसे पियूष पेढीवर आले. त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. मात्र, नेमकी कितीची चोरी झाली हे झाड कोल्हापुरातच आल्यावर समजू शकेल असे नातेवाइकांकडून त्यांना सांगण्यात आले. त्यांनी तशी चोरट्यांची शोधमोहीम सुरू केली.

आज दुपारी झाड कोल्हापुरात आले. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून चोरी गेलेल्या दागिन्यांचा तपशील दिला. 650 ग्रॅम वजनाचे सोने आणि ग्राहकांकडून ऍडव्हान्स म्हणून घेतलेली 14 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी पळवल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली. शहर पोलिस उपाधीक्षक भारतकुमार राणे यांच्यासह जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख, राजारामपुरीचे अमृत देशमुख, लक्ष्मीपुरीचे तानाजी सावंत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे दिनकर मोहिते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चोरीची माहिती घेऊन तपास सुरू केला. जुना राजवाडा पोलिसांत चोरीची नोंद झाली आहे.

गजबजलेल्या रस्त्यावर प्रकार
ताराबाई रोड हा रात्री उशिरापर्यंत गजबजलेला असतो. अगदी रस्त्यालगत असलेल्या झाड यांची सराफ पेढी चोरट्यांनी फोडल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सीसीटीव्हीत चोरटे कैद
पेढीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दोन चोरटे कैद झाले आहेत. अंदाजे 18 ते 25 वयोगटांतील हे चोरटे असून, अंगाने सडपातळ आहेत. दोघांनी अंगात फूल शर्ट आणि पॅंट घातली आहे. डोक्‍याला कानटोपडे आणि तोंडाला रुमाल बांधलेला आहे. दोघांच्या पाठीवर सॅक होती. काऊंटरवरील दागिने आणि ड्रॉव्हरमधील दागिने, रोकड त्यांनी सॅकमध्ये घातली. एका चोरट्याने कॅमेरा पाहिल्यानंतर त्याने तो कॅमेरा भिंतीच्या दिशेने फिरवला.

27 मिनिटांत साधला डाव
परिसरातील सीसीटीव्हीमध्ये चोरटे रात्री 9.40 ला पेढीच्या मुख्य दरवाजामधून आत गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आतील दरवाजाचे कुलूप तोडून, काचेचा दरवाजा फोडून ते दोघे 9.53 ला पेढीत शिरले. दोघांनी तेथे 9.56 पर्यंत पेढीत चोरी केली. त्यानंतर ते मागील दरवाजातून 10.7 मिनिटांनी बाहेर पडल्याचे दिसते. अवघ्या 27 मिनिटांत चोरट्यांनी आपला डाव साधल्याचे तपासात पुढे आले आहे.

सीसीटीव्ही कॅमेरा फोडला
पेढीच्या डाव्या बाजूला सोन्याचे दागिने व पैसे ठेवणाऱ्या खोलीत चोरट्यांनी प्रवेश केला; मात्र सुरवातीलाच त्यांना येथे सीसीटीव्ही कॅमेरा असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तो फोडला. त्यामुळे या खोलीतील चित्रण पोलिसांना मिळाले नाही.

चोरट्यांचा परिसरात वावर
पेढी फोडण्यापूर्वी काही काळ चोरटे तोंडाला रुमाल लावून परिसरात वावरत असल्याचे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून समोर आले आहे.

दागिने, रोकड असलेल्या कपाटावरच डोळा
पेढीसमोरील खोलीत तीन लोखंडी कपाटे आहेत. त्यातील एका कपाटात दागिने व रोकड ठेवली जाते. चोरट्यांनी फक्त तीच तिजोरी मिळालेल्या चाव्यांच्या साह्याने उघडून हात साफ केले. हे काम माहितीगारांचेच असावे आणि रेकी करून त्यांनी हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांना आहे.

12 ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात
ताराबाई रोडवरून बाहेर जाणाऱ्या 12 मार्गांवरील सीसीटीव्हींचे फुटेज पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले आहेत. त्या आधारे चोरटे नेमके कोणत्या दिशेने गेले याचा पोलिस तपास घेत आहेत.

Web Title: Teeft in jewellery shop