सांगा जयंतराव, आपल्या प्रतिज्ञेचे काय?

सांगा जयंतराव, आपल्या प्रतिज्ञेचे काय?

जिल्ह्यात ज्यांचे बोट धरून भाजप वाढली, त्यांना या निवडणुकीत भाजपचे डिपॉझिट जप्त करेन, अन्यथा माझे नाव बदला, अशी प्रतिज्ञा करावी लागली होती. खरोखर भाजप आपल्याशिवाय एवढे वाढेल हा जयंतरावांचा अंदाज चुकलाच... त्याची निष्पत्ती म्हणजे शून्यातून ब्रॅंडेड अशी २५ कमळे येथे फुलली आहेत. भाजपचा विजय हा एकट्या कोणाचा नाही. हा जिल्हा परिषदेचा गोवर्धन उचलण्यासाठी अनेक पक्षांतून आलेल्या सर्वांचे हात यासाठी लागले आहेत. जनतेलाही गृहित धरू नका, असा संदेशही या निकालामागे आहे. इथल्या सत्तेत वर्षानुवर्षे तेच कारभारी देऊन पाहिले. बडबड खूप होते, पण बदल काही होत नाही, म्हणून भाकरी बदलून पाहूया, असे जनतेलाही वाटले!
 

आणीबाणीनंतर देशात परिवर्तन घडलं, पण सांगलीत काँग्रेस हलली नव्हती. मिरज पंचायत समितीत काँग्रेस कालपर्यंत हलली नव्हती. तीन वर्षांपूर्वी जनतेने पहिल्यांदा इथला काँग्रेसचा खासदार बदलला, मग आमदारही अनेक ठिकाणी बदलले आणि आता जिल्ह्याची सर्वात मोठी स्थानिक स्वराज्य संस्था, येथे जो बदल घडला, त्यामागे प्रामुख्याने जे तालुके आहेत, त्यात मिरज तालुक्‍याचा सिंहाचा वाटा आहे. जत, खानापूर, आटपाडी आणि कडेगाव व पलूसमधील धक्‍कादायक निकाल काँग्रेसची झोप उडवणारे, तर राष्ट्रवादीला धक्‍का देणारे आहेत. पाच तालुक्‍यांतून काँग्रेस नामशेष झाली आहे.

या स्थितीचा थोडा अंदाज असलेले आणि धूर्त राजकारणी असलेल्या जयंतरावांनी म्हणूनच पतंगरावांना आणि मोहनरावांना आघाडीसाठी गळ घातली होती. पण विधान परिषदेतील आरोपांची शाई अजून वाळली नव्हती. मोहनरावांनी धनशक्‍तीचा वापर करून निवडणूक जिंकली, असे आरोप जयंतरावांनी केले होते. त्यामुळे काँग्रेसने राष्ट्रवादीबरोबर जाऊ नये, असा दबाव कार्यकर्त्यांचाही काही ठिकाणी होता; तर काही ठिकाणी आधीच कदमांनी सोय पाहिली होती. निकालानंतर जर-तर याला काही अर्थ नसतो, पण जयंतरावांचे पतंगरावांनी ऐकले असते तर? विशाल पाटील यांच्यासह दादा गटाने कदमांशी जमवून घेतले असते तर? हे कळीचे मुद्दे असल्याने यावर चर्चा तर होत राहणारच! अर्थात राजकारणात अशी कारणे उपकथानकासारखी असतात. तीच राजकारणात बदल घडविण्यास कारणीभूत ठरत असतात. अर्थात भाजपही अनेक पक्षातील नेत्यांचे कडबोळे आहे, येथेही एकमेकाचे टोकाचे वाद आहेत.

पण मुख्यमंत्र्यांनी झेडपीच्या परफॉर्मन्सवर येथे मंत्रिपद लागू होईल, असे सांगितल्यानेही आमदारांनी आपापल्या तालुक्‍यात ताकद पणाला लावली. यात विलासराव जगताप, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ यांनी आपल्या विभागात चोख कामगिरी बजावली. शिराळ्यात राष्ट्रवादी व काँग्रेसने तटबंदी करून शिवाजीराव नाईकांकडून गोल रोखले. तेच तासगावातही झाल्याने संजयकाकांना दोन जागांवरच समाधान मानावे लागले. पृथ्वीराज देशमुखांनी अरुण लाड यांच्याशी आघाडी करून काँग्रेस खिळखिळी केली. ज्या गोष्टींचा थोडा अंदाज येऊनसुद्धा पतंगराव काही करू शकले नाहीत. काँग्रेसमध्ये वाद नाहीत असे रेटून ते सांगत राहिले; पण अंतर्गत वाद आणि उमेदवार वाटपातील घोळाने काँग्रेस भुईसपाट झाली. वरील सर्व घटनाक्रम पाहता जयंतरावांचा एक अंदाज होता. तोदेखील फसला. काँग्रेसने कमी जागा घेतल्याने बीजेपीच्या जागा वाढल्या. आपल्या मर्यादा त्यांना कळल्या होत्या. त्यामुळेच भाजपचे डिपॉझिट जप्त करू, असं विधान कोणत्या आधारावर ठरू शकते? याबाबत प्रश्‍न उपस्थित होते. आपल्या मर्यादा कळल्या होत्या. त्यामुळेच ते पतंगरावांना आघाडीची गळ घालत होते. त्यांचे कदाचित गणित असे असावे. काँग्रेस २० पर्यंत मजल मारेल आणि भाजप आपोआपच कट्ट्यावर बसेल, पण नऊ वर्षे अर्थमंत्री राहिलेल्या जयंतरावांचे पुन्हा एकदा गणित चुकले. तसेच काँग्रेसकडे कोणतीही रणनीती नसल्यामुळे भाजपला छप्पर फाडके यश मिळाले. 

हे यश भाजपला मिळण्यासाठी काँग्रेसनेच मोठा हातभार लावला. बीजेपीचे डिपॉझिट तर वाचवलंच; तर त्यांना सत्तासोपानाचा मार्ग रिकामा करून दिला. त्यामुळे काँग्रेस जरी सपाटून हरली असली तरी राष्ट्रवादी सत्तेपासून बाजूला गेली या आनंदात काँग्रेसवाले आहेत. अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा संघर्ष हा विधान परिषदेच्या निवडणुकीपासून सुरू होता. मात्र हा संघर्ष बीजेपीला झेडपीच्या सत्तेपर्यंत पोहोचण्याचा महामार्ग ठरला आहे.

त्यामुळे जयंत पाटलांची प्रतिज्ञा भंगली असून आपणच एक काळ बोट धरून ज्यांना चालायला शिकविले, त्यांच्या हाती झेडपीची सत्ता पाच वर्षे पाहावी लागणार आहे. अर्थात हे सर्व एका रात्रीत घडले नाही. १५ वर्षांच्या आघाडीच्या सत्तेत जयंतराव आणि आर.आर. पाटील हे दोघेच मंत्री म्हणून राहिले. जी काही लाभाची पदे होती, ती त्यांच्या जवळच्यांनाच मिळाली.

त्यामुळे अनेक नेते नाराज झाले. या नाराजीचाच सूर म्हणून कडेगाव, आटपाडी, खानापूर, जत, कवठेमहांकाळ या तालुक्‍यांतील नेत्यांनी दुष्काळ फोरमची निर्मिती करून जिल्ह्यात आपला वेगळा दबाव गट तयार केला. नंतर हाच फोरम जयंतरावांच्या सांगण्यावरून टप्प्याटप्प्याने भाजपच्या वळचणीला गेला तसेच जिल्ह्यात टप्प्याटप्प्यानेच भाजपला यश मिळत गेले. आजघडीला जिल्ह्यात भाजप नंबरचा १ चा पक्ष बनला आहे आणि तो आता झेडपीत सत्ता स्थापन करण्याच्या वाटेवर आहे.

एकूणच पश्‍चिम महाराष्ट्रात साताऱ्याने राष्ट्रवादीचा गड राखला; मात्र सांगली, कोल्हापूरसारखे दोन्ही भक्कम गड नव्याने पुढे आलेल्या बीजेपीने खिळखिळे केले आहेत. या मागे भाजप नेतृत्वाची खेळी दिसते. त्यांनी जशा विरोधकांच्या फायली बाहेर काढल्या तसेच ते सत्तेशिवाय जगू शकत नाहीत, त्यांची कमजोरी लक्षात घेऊन बीजेपीने डाव टाकले. या डावात राजेंद्रअण्णांसारखे नेते आपसूक भाजपच्या जाळ्यात अडकले आणि तिथेच जयंतरावांच्या अडचणी वाढत गेल्या. राजकारणात जो उद्योग त्यांनी यापूर्वी केला त्यातीलच धडे चेल्यांनी वाचून त्यांना नवी राजनीती शिकविली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com