तापमान वाढले, पण अजून वळवाला अनुकूलता नाही! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मार्च 2017

कोल्हापूर - गरम हवेच्या लाटांमुळे शहर परिसरात आज दुपारचे वातावरण तप्तच राहिले. यामुळे अंगाची लाहीलाही होऊन घामाच्या धारांनी अंग चिंब भिजून निघाले. आज कमाल तापमान 40 तर किमान तापमानाची 21 डिग्री सेल्सिअस इतकी नोंद झाली. सकाळी तापमान 36, तर दुपारी 40, संध्याकाळी 35 डिग्री सेल्सिअस राहिले. 37 ते 47 टक्के हवेतील आर्द्रतेचे प्रमाण होते. सातत्याने बदलणाऱ्या ढगांचे प्रमाण 18 ते 25 टक्के दरम्यान राहिले. दिवसभर तापमान 36 ते 40 डिग्री सेल्सिअस राहिले; मात्र भूपृष्ठाच्या तापमानात वाढ, हवेतील आर्द्रतेचे प्रमाण, वाऱ्यांची निर्मिती आदी अनुकूल घटकांची निर्मिती न झाल्याने वळवाचा शिडकावा झाला नाही. 

दोन दिवसांपूर्वी 35 डिग्री सेल्सिअस तापमान असूनही बुलढाणा (11 मि.मी.), चंद्रपूर (2.2), अकोला (0.7), यवतमाळ (0.4) येथे वळवाच्या सरी कोसळल्या. कोल्हापूर जिल्ह्यात तापमान 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेल्याने दिवसभर तापणाऱ्या उन्हाचा चटका सहन करणाऱ्या कोल्हापूरवासीयांना निदान सायंकाळी चारनंतर तरी वळवाच्या सरींनी वातावरणात गारवा निर्माण होईल, असे वाटले होते; पण सकाळी 11 ते सायंकाळी चारपर्यंत जमा झालेले ढगांचे पुंजके वाऱ्यामुळे अन्यत्र विखुरल्यामुळे वळवास योग्य वातावरण निर्माण झाले नाही. जसजसे तापमान वाढत जाते; तसे एकावर एक याप्रमाणे दाट पुंजक्‍यांनी ढगांचे दाट थर निर्माण होतात. कोल्हापूर परिसरात प्रामुख्याने दक्षिण, पश्‍चिम क्षितिजावर आज ढगांची साधारण दाटी राहिली. मधले आकाश तुलनेने निरभ्र राहिल्याने पारा 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत स्थिरावला. 

याबाबत विवेकानंद महाविद्यालयाच्या भूगोल विभागातील सहयोगी प्रा. डी. सी. कांबळे म्हणाले, ""तापमानात वाढ झाली असली तरी हवेतील आर्द्रतेचे प्रमाण हे 60 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असले पाहिजे. यामुळे वळीवासाठी अनुकूल वातावरण निर्माण होते. सूर्यकिरणांमुळे नुसतीच हवा उष्ण होऊन वळीव होत नाही. यासाठी भूपृष्ठ भरपूर तापावे लागते. भूपृष्ठ तापले, की हवा गरम होऊ लागते. मग ही गरम झालेली हवा वर जाऊ लागते. तसे कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊन तिथे निर्माण झालेल्या पोकळीची जागा घेण्यासाठी बाष्पयुक्त वारे येतात. यातून वादळी परिस्थिती, विजा, ढगांचा गडगडाट होऊन वळवाच्या सरी कोसळतात. यापैकी कमी दाबाचे पट्टे अजून आपल्या परिसरात झालेले नाहीत. येत्या काही दिवसांत ही परिस्थिती निर्माण होऊन वळीव कोसळू शकेल. आपल्याकडे प्रामुख्याने जमिनीचे तापमान वाढले, की तिथे जागा घेण्यासाठी पूर्वेकडील बाजूने हे बाष्पयुक्त वारे येतात.'' 

जिल्ह्यात अजून कुठेही वळीव झालेला नसल्यामुळे रानमेवा, आंबे बाजारात मोठ्या प्रमाणात आलेले नाहीत. साधारणपणे एप्रिलच्या मध्यापर्यंत हे प्रमाण वाढेल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. उष्ण वाऱ्यांमुळे शीतपेये, आइस्क्रीम, उसाचा रस, लिंबूपाणी आदी विक्रीत मात्र विक्रमी वाढ झाली आहे. 

ही तर आम्रवर्षा 
दक्षिण-पूर्व आशियात विशेषत: भारत, कंबोडियात मार्चचा मध्य ते एप्रिलमध्ये वळवाचा पाऊस झाला, की आंबे पिकायला सुरवात होते. पिकलेले हे आंबे मोठ्या प्रमाणात बाजारात आल्यावर लोकही खूश होतात. म्हणून तमिळनाडू, केरळ, कर्नाटकात या पावसाला आम्रवर्षा म्हणतात. हा पाऊस वादळवारा, विजांच्या कडकडाटासह कोसळतो. प्रदेशाप्रमाणे त्याचे प्रमाण हे कमी-जास्त असते. हिमालय परिसरातील वातावरणात बदल, बंगालच्या उपसागरात वादळी वाऱ्याची निर्मिती झाली, की मार्च-एप्रिलमध्ये हा पाऊस इकडे कोसळतो. 

Web Title: temperature high in kolhapur