फाल्गुनपासूनच वैशाख वणव्याचा झटका

बलराज पवार
गुरुवार, 30 मार्च 2017

जिल्ह्यात पारा चाळीसवर स्थिर - गेल्‍या पाच वर्षांतील विक्रमी तापमानाची नोंद
सांगली - चैत्राची सुरवात नुकतीच झाली; मात्र सांगली जिल्हा फाल्गुनपासून वैशाख वणव्याचा अनुभव महिनाभर घेत आहे. गेल्या आठवड्यात तर पारा ३९ ते ४० अंशावर स्थिर राहिला. किमान तापमानही २३ ते २६ अंशादरम्यान राहिले. तीव्र उष्णतेने लाही लाही होण्याचा अनुभव नागरिक घेत आहेत. अजून एप्रिल, मे महिना बाकी आहे. यंदा उन्हाळ्यात विक्रमी तापमानाची नोंद होण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्यात पारा चाळीसवर स्थिर - गेल्‍या पाच वर्षांतील विक्रमी तापमानाची नोंद
सांगली - चैत्राची सुरवात नुकतीच झाली; मात्र सांगली जिल्हा फाल्गुनपासून वैशाख वणव्याचा अनुभव महिनाभर घेत आहे. गेल्या आठवड्यात तर पारा ३९ ते ४० अंशावर स्थिर राहिला. किमान तापमानही २३ ते २६ अंशादरम्यान राहिले. तीव्र उष्णतेने लाही लाही होण्याचा अनुभव नागरिक घेत आहेत. अजून एप्रिल, मे महिना बाकी आहे. यंदा उन्हाळ्यात विक्रमी तापमानाची नोंद होण्याची चिन्हे आहेत.

एरवी उन्हाची तीव्रता एप्रिलमध्ये जास्त जाणवू लागते. त्याची चाहूल मार्चमध्ये लागली तरी यंदाएवढा कडक उन्हाळा पाच वर्षांत जाणवला नव्हता. यंदा मात्र पाच वर्षांतील तापमानाचे विक्रम मोडले जाण्याचे संकेत पारा देऊ लागला आहे. मार्चच्या सुरवातीपासून तापमान वाढू लागले.

शेवटच्या आठवड्यात तर पारा ४० अंशावर स्थिर झाला. सलग पाच दिवस कमाल तापमान ४० अंश राहिले आहे. ऐन परीक्षेच्या हंगामात तीव्र उष्णतेने सांगलीकर हैराण झालेत. पाच वर्षांत पारा सलग ४० वर राहण्याचा हा विक्रमच आहे. एप्रिलमध्ये जर तापमान आणखी वाढले तर उष्माघाताचा धोका वाढण्याची चिन्हे आहेत. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉक्‍टरांनी केले आहे. वास्तविक खरा उन्हाळा चैत्र आणि वैशाख महिन्यांतच असतो; मात्र फाल्गुन महिन्यात उष्णतेने ही परंपरा मोडली आहे. त्यामुळे वैशाखातील तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने आणि मे महिन्यात वळवाने हजेरी लावली तर पारा थोडा खाली येईल. 

पाणी, क्षार घ्या
डॉ. भागवत म्हणाले, ‘‘उष्णतेचा त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी दिवसाला किमान अडीच ते तीन लिटर पाणी प्यावे. चालणे, व्यायाम करणारे, शारीरिक कष्टाची कामे करणाऱ्यांनी तीन ते पाच लिटर पाणी प्यावे. एकदम उन्हात जाणे टाळावे. पाण्याबरोबरच क्षाराचे प्रमाण राखण्यासाठी लिंबू सरबत घ्यावे, फळे खावीत. नाचणीची आंबीलही चांगली असते. साय काढलेले ताक प्यावे. मात्र मांसाहार आणि दुधाचे पदार्थ टाळावेत. यामुळे ॲसिडिटी वाढते.’’

किमान तापमान वाढले
यंदा किमान तापमानातही चांगलीच वाढ झाली. आठवडाभरात तापमान २३.५ ते २६ इतके तीव्र राहिले. उष्णतेचा त्रासही नागरिकांना होऊ लागला. चार वर्षांत सरासरी किमान तापमान १४ ते १८ या दरम्यान होते; पण यात यंदा मोठी वाढ झाल्याचे दिसते आहे.

चार वर्षांतील मार्चचे तापमान
वर्ष           कमाल       किमान

२०१३      ३९.३       १८.१
२०१४      ३९.५       १३.६ 
२०१५      ३८.०       १३.२
२०१६      ४०.०       १६.८

वैशाख आणि ज्येष्ठ महिन्यात उन्हाळा तीव्र असतो. यंदा फाल्गुनपासून तापमान वाढल्याचे दिसते. ‘डीहायड्रेशन’ म्हणजेच शरीरातील पाणी व क्षार कमी होण्याचा धोका असतो. विशेष करून मधुमेह, रक्तदाब, किडनीचे आजार असलेल्या रुग्णांनी काळजी घ्यावी. तापमानामुळे आजार वाढतो. रक्तदाब वाढल्याने उष्माघाताचा धोका असतो.
- डॉ. राजेंद्र भागवत, अधीक्षक, वसंतदादा शासकीय रुग्णालय, सांगली 

Web Title: temperature increase in sangli