जिल्ह्यातील 90 टक्के माजी सैनिकांना तात्पुरती "दारूबंदी' 

जिल्ह्यातील 90 टक्के माजी सैनिकांना तात्पुरती "दारूबंदी' 

रांजणी - राज्यमार्गावरील दारू दुकान बंदीच्या कचाट्यात कवठेमहांकाळचे माजी सैनिकांचे कॅन्टीनही अडकल्याने जिल्ह्यातील 12 हजार माजी सैनिकांना गेल्या एक एप्रिलपासून हक्काची लिकर बंद झाली आहे. प्रत्येक सैनिकाला दरमहा साडेसातशे मिलीच्या चार बाटल्या सवलतीत उपलब्ध होत असतात. त्यावरच आता संक्रात आली आहे. कॅन्टीनचे गोदामच उत्पादन शुल्क विभागाने सील केले असून आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ते अन्यत्र हलवण्यासाठीची परवानगीची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र मंदगतीच्या सरकारी कारभाराचा इथेही फटका बसत असून कागदापत्रे व परवानगीच्या प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी माजी सैनिकांची आहे. 

जिल्ह्यात सांगली आणि कवठेमहांकाळला अशी दोन सैनिक कॅन्टीन आहेत. माजी सैनिकांना जीवनोपयोगी वस्तू इथे सवलतीच्या दरात उपलब्ध होतात. न्यायालयीन आदेशात कवठेमहांकाळचे कॅन्टीन अडकले कारण ते मिरज-पंढरपूर राज्यमार्गावर येते. या कॅन्टीच्या कक्षेत जिल्ह्यातील 90 टक्के म्हणजे सुमारे 12 हजार माजी सैनिकांची नोंदणी आहे. या सर्वच सैनिकांना सक्तीच्या दारूबंदीला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्याच्या शिराळा, इस्लामपूर आणि मिरज असे तीन तालुके सांगली कॅन्टीनशी जोडलेली आहेत. या तालुक्‍यांमध्ये माजी सैनिकांचे प्रमाण जिल्ह्याच्या तुलनेत अवघे दहा टक्केच आहे. त्यामुळे कवठेमहांकाळवरच मोठा ताण येतो. 

कॅन्टीन व्यवस्थापक एन. डी. जानकर म्हणाले,""सध्या उत्पादन शुल्क विभागाने आमच्या लिकर गोदामालाच टाळे लावले आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदरच करू. मात्र प्रशासनाने गोदाम अन्यत्र हलवण्यासाठी आवश्‍यक ती प्रक्रिया जलदगतीने करावी. माजी सैनिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यासाठी आमच्या कार्यालयाकडील पत्रव्यवहार आम्ही पूर्ण केला आहे. या कॅन्टीनशी शेजारच्या पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतीलही काही माजी सैनिकांची नोंदणी आहे. महिन्याकाठी 50 लाख रुपयांची लिकर विक्री होते. एकूण ताण विचारात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्तिगत लक्ष घालून स्थलांतरासाठीची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी.'' 

सैनिकांपेक्षा पाहुण्यांची गोची 
कवठेमहांकाळ तालुक्‍यातील रांजणी धुळगाव ही गावे सैनिकांची म्हणूनच ओळखली जाते. घरटी एक दोन सैनिक आजही सैन्यात आहेत. शिवाय पंचक्रोशीत सुमारे सहा हजार माजी सैनिक आहेत. त्यातच रांजणीची येत्या 17 ते 19 एप्रिलदरम्यान जत्रा आहे. अन्य गावांच्या जत्राही आता पाठोपाठ आहेत. या जत्रा मटनाबरोबरच सैनिकांच्या सवलतीच्या दारूसाठीही प्रसिद्ध आहेत. पै-पाहुणे खास सवड काढून केवळ आणि केवळ "फुल्ल' आनंदासाठी जत्रेला येतात. त्या "फुल्ल' आनंदावरच विरजन पडले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com