जिल्ह्यातील 70 हजारावर वीज ग्राहकांना तात्पुरता दिलासा 

घनशाम नवाथे 
Thursday, 4 March 2021

जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत ग्राहकांची वीज जोडणी तोडू नका असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात दिले. त्यामुळे जिल्ह्यातील 70 हजार 733 घरगुती ग्राहकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. त्यांच्याकडील थकबाकी 31 कोटी 66 लाख रूपये इतकी आहे. 

सांगली : जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत ग्राहकांची वीज जोडणी तोडू नका असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात दिले. त्यामुळे जिल्ह्यातील 70 हजार 733 घरगुती ग्राहकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. त्यांच्याकडील थकबाकी 31 कोटी 66 लाख रूपये इतकी आहे. 

गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव निर्माण झाल्यानंतर वीज मीटर रिडिंग, बिल वाटप आणि बिल भरणा केंद्र बंद करण्यात आले. लॉकडाउनमध्ये शिथीलता आल्यानंतर ग्राहकांना तीन महिन्याची बिले एकदम देण्यात आली. तशातच वीज बिलात वाढही झाली होती. त्यामुळे ग्राहकांना बिले वाढून आली. त्याचा परिणाम म्हणून अनेक ग्राहकांनी बिले भरण्यास टाळाटाळ केली. महावितरणने वीज बिलाबाबत शंका दूर करण्यासाठी प्रबोधन केले. 

ग्राहकांनी ऑनलाईन व प्रत्यक्ष भरणा केंद्रात बिल भरण्यासाठी आवाहन केले. याच काळात वीज बिल माफ करावे यासाठी काही राजकीय पक्ष व संघटनांनी मोहिम सुरू केली. त्यामुळे ग्राहकांनी बिल भरण्यास उदासिनता दाखवली. एप्रिलपासून वीज बिलाची थकबाकी वाढतच गेली. त्यामुळे महावितरणसमोर आर्थिक संकट निर्माण झाले. वीज बिलात कोणतीही माफी मिळणार नसल्याचे स्पष्ट करत वसुलीची मोहिम तीव्र केली. गेल्या काही दिवसापासून थकबाकीदार ग्राहकांच्या वीज जोडण्या तोडण्याची मोहिम सुरू केली. त्यामुळे ग्राहकांच्या संतापाला सामोरे जावे लागत होते. काही ठिकाणी वीज कर्मचाऱ्यांना अडवण्याचे प्रकारही घडले. 

जिल्ह्यात एप्रिल 2020 पासून एकही वीज बिल न भरणा केलेल्या ग्राहकांची संख्या महिन्यापूर्वी एक लाख 78 हजार 301 इतकी होती. त्यांच्याकडील थकबाकी 113 कोटी 11 लाख रूपये होती. परंतू वीज कनेक्‍शन तोडण्याच्या मोहिमेचा परिणाम म्हणून महिनाभरात एक लाख 7 हजार 568 ग्राहकांनी 81 कोटी 45 लाख रूपयांचा भरणा केला. त्यामुळे सध्या 70 हजार 733 ग्राहकांकडे 31 कोटी 66 लाख रूपये थकबाकी आहे. 

अधिवेशनात थकबाकीदारांची जोडणी न तोडण्याचा आदेश दिल्यामुळे जिल्ह्यातील 70 हजार 733 थकबाकीदार ग्राहकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी थकबाकीबाबत निर्णयाची प्रतिक्षा मात्र या ग्राहकांना लागून राहणार आहे. 

 

 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Temporary relief to 70,000 electricity consumers in the district